भरधाव कारने डिव्हाइडर तोडून पलीकडे उभ्या असलेल्या महिलेला उडवले

मंगळुरू : वृत्तसंस्था – मंगळुरूमध्ये एक विचित्र अपघात घडला आहे. यामध्ये एका भरधाव बीएमडब्ल्यू कारने डिव्हाइडर तोडून स्कूटी चालवणाऱ्या एका महिलेला धडक दिली. हा भीषण अपघात त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे कि, स्कूटीवरून निघालेली महिला रस्त्याच्या दुभाजकाच्या बाजूला उभी होती. यादरम्यान भरधाव वेगाने एक बीएमडब्ल्यू कार आली आणि थेट दुभाजकच्या पलीकडे येऊन स्कूटीवर आदळली.

हि अपघाताची घटना कर्नाटकातील मंगळुरू या ठिकाणी घडली आहे. या अपघातात स्कूटी चालक महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. ही घटना शनिवारी मंगळुरू जिल्ह्यातील बल्लभगढ जंक्शन परिसरात घडली आहे. दुपारी जवळपास एकच्या सुमारास हा अपघात झाला. एका व्यक्तीने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून या भयंकर अपघातचा व्हिडिओ शेअर केला आहे.

तसेच या व्हिडिओमध्ये दुभाजकावर दुसरी महिला रस्ता ओलांडण्यासाठी उभी होती. या अपघातात ती थोडक्यात बचावली. कारण कार रस्त्याच्या पलीकडे उभ्या असलेल्या स्कूटी स्वार महिलेला धडकली. मात्र, यादरम्यान दुभाजकावर उभ्या असलेल्या महिलेचा तोल गेल्याने ती जमिनीवर पडली. या अपघातानंतर लोकांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. यावेळी संतापलेल्या लोकांनी गाडीच्या चालकाला मारहाण सुरू केली. मंगळुरू वाहतूक पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.