Saturday, February 4, 2023

Happy Anniversary बॉलिवूड जगतातील आदर्श जोडपे अमिताभ आणि जया यांच्या सहजीवनाची ४८ वर्ष पूर्ण

- Advertisement -

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे. बिग बी व जया यांच्या सहजीवनाला आज तब्बल ४८ वर्षे पूर्ण झाली आहेत. ह्यांची जोडी बॉलिवूड जगतातील एक आदर्श जोडपे म्हणून ओळखली जाते. अमिताभ व जया यांची पहिली भेट ‘गुड्डी’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. ऋषीकेश मुखर्जी यांनी त्यांची भेट घालून दिली होती. अमिताभ पहिल्याच नजरेत जया यांच्या प्रेमात पडले पण जया यांना अमिताभ किंचतही आवडले नव्हते. मात्र नंतर दोघांमध्ये मैत्री झाली. यानंतर ‘बावर्ची’च्या सेटवर अमिताभ व जया यांच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले.

- Advertisement -

अमिताभ व जया यांनी १९७३ साली ‘जंजीर’मध्ये एकत्र काम केले होते. या चित्रपटादरम्यान दोघांनी एकमेकांसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. ‘जंजीर’ जर हिट झाला तर सर्वजण मिळून लंडनमध्ये फिरायला जाऊ, असे ‘जंजीर’च्या संपूर्ण टीमने ठरवले होते. यात अमिताभ व जया हे ही दोघे होते.

यानंतर ‘जंजीर’ हिट झाला आणि अमिताभ यांनी लंडनला जाण्याची तयारी जोरोशोरोसे सुरु केली. पण यापूर्वीच त्यांचे वडील अर्थात हरिवंशराय बच्चन यांची परवानगी घेण्यासाठी अमिताभ गेले. लंडनचे नाव ऐकताच कोण कोण जाणार, असा प्रश्न हरिवंशराय यांनी अमिताभ यांना केला. या नावांच्या यादीमध्ये जया यांचे नाव ऐकताच त्यांनी स्पष्ट नकार दिला.

 

या उपर लंडनला जायचे असेल आणि जयाही सोबत येणार असेल अर्थात जयासोबत तुला जायचे असेल तर आधी तिच्यासोबत लग्न कर. लग्न न करता मी तुला जयासोबत जाऊच देणार नाही, असे हरिवंशराय यांनी अमिताभ यांना वडील म्हणून ठणकावून सांगितले. मग काय? वडिलांचा शब्द त्याना टाळता येणार नव्हता कारण तितके ते नक्कीच आज्ञाधारक होते. मात्र लंडनला जायचा बेत त्यांचा पक्का ठरला होता.

अखेर अमिताभ यांनी वडिलांच्या इच्छेखातर लग्न करण्याचा निर्णय घेतला. यानंतर घाईघाईत अगदी २४ तासांच्या आतच त्यांनी लग्न केले. या लग्नाला केवळ पाच लोकांची उपस्थिती होती. अशी यांच्या लग्नाची कहाणी सुफळ संपन्न.. तिथे एकमेकांचा हात धरून दिलेली वचनं आजतागायत ते दोघेही तितक्याच प्रामाणिकपणे पूर्ण करीत आहेत. अनेकदा अनेक गोष्टी विचित्र स्वरूपाने माध्यमांमध्ये पसरविल्या गेल्या मात्र अमिताभ आणि जया यांनी एकमेकांची साथ कधीच सोडली नाही. याउलट त्यांचे नाते आणखीच घट्ट झाले.