Wednesday, June 7, 2023

तुम्ही तो खांदा आहात, ज्यावर मी कधीही डोकं टेकू शकते; ‘मदर्स डे’निमित्त जेनेलिया देशमुखची भावुक पोस्ट

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज आंतरराष्ट्रीय मदर्स डे असून अनेक कलाकार आपापल्या आईचे सोशल मीडियावर आभार मानत आहेत सोबतच भरभरून शुभेच्छा देत आहेत. या निमित्ताने अभिनेत्री जेनेलिया देशमुखनेदेखील अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. जेनेलियाने आपली आई जेनेट डिसूझा आणि आपल्या सासूबाई वैशाली देशमुख यांचे नातवंडांसोबतचे फोटो शेअर केले आहेत. तुम्ही तो खांदा आहात, ज्यावर मी कधीही डोकं टेकू शकते, अशा शब्दात जेनेलियाने आपल्या भावना त्यांच्याप्रती व्यक्त केल्या आहेत.

या पोस्टमध्ये जेनेलियाने दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये जेनेलियास्वतः तिची २ मुले रियान आणि राहिल तसेच तिची आई जेनेट डिसूझा दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्ये रियान-राहिल आणि स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या पत्नी आणि जेनेलियाच्या सासूबाई वैशाली देशमुख दिसत आहेत. या पोस्टबाबत व्यक्त होताना तिने लिहिले कि, ‘मातांमध्ये आपल्या मुलांसाठी नि:स्वार्थपणे आणि स्वतःला झोकून देऊन जगण्याची आश्चर्यकारक क्षमता असते. मुलांना ते स्वत: पालक होईपर्यंत त्याची जाणीवही नसते. हे २४ गुणिले ७ चालणारं असं काम आहे, ज्यात कुठलीही विश्रांती नाही, सुट्टी नाही, आणि महत्त्वाचं म्हणजे सर्वात कमी कृतज्ञता किंवा गृहित धरण्याची वृत्ती’ याकडे जेनेलियाने लक्ष वेधलं.

‘प्रिय आई, प्रिय मम्मा.. तुमच्याशिवाय मी काय केलं असतं, मला समजत नाही. आणि मला ते जाणूनही घ्यायचं नाही. मी तुमच्याशिवाय कामच करु शकत नाही. तुम्ही तो खांदा आहात, ज्यावर मी कधीही डोकं टेकू शकते. मला माहित आहे, मी तुम्हाला हे फार वेळा सांगितलं नसेन, पण मला तुम्हाला इतकंच सांगायचंय, की आय लव्ह यू आणि तुमच्यासाठी मी देवाचे रोज आभार मानते’.

अभिनेत्री जेनेलिया देशमुख हि अभिनेता व स्वर्गीय विलासराव देशमुख यांचा मुलगा रितेश देशमुखच्या पत्नी आहे. हि जोडी बॉलिवूड जगतातील लोकप्रिय जोडी आहे. जेनेलिया आणि रितेश दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. त्यांचे फॉलोअर्स देखील खूप आहेत.

जेनेलियाच्या या मदर्स दे स्पेशल पोस्ट वर तिच्या चाहत्यांनी तर भरभरून कमेंट्स केल्या आहेतच. पण विशेष म्हणजे तिच्या जाऊबाई दीपशीखा देशमुख यांनीही सो क्यूट अशी कमेंट केली आहे. त्याला जेनेलियाने लाईक करत आभार मानले आहेत. जेनेलिया दरवर्षी मदर्स डे निमित्त वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत आपल्या आई आणि सासूबाईंचे ती नेहमीच ऋण व्यक्त करीत असते.