आपल्या बॉलिवूड मधील प्रवासाबद्दल मनोज वाजपेयी म्हणाला ‘मीही त्यावेळी आत्महत्याच करणार होतो, पण…’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बिहारमधून बॉलिवूडमध्ये येण्याचा हा प्रवास अभिनेता मनोज वाजपेयी याच्यासाठी अजिबात सोपा नव्हता. या बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये कोणत्याही गॉडफादरशिवाय येऊन मनोज वाजपेयीने आपली स्वत:ची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या संघर्षाच्या काळात आपल्याही मनात एकदा आत्महत्या करण्याचा विचार आला होता, मात्र त्यावेळी त्याच्या मित्रांनी त्याला फार साथ दिली, असे मनोज वाजपेयींच्या सांगितले. बिहार पासून सुरु झालेला बॉलिवूड पर्यंतचा आपला हा प्रवास कसा होता, याबद्दल त्याने ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ याना दिलेल्या एका मुलाखतीत सांगितला.

माझा स्ट्रगलिंगचा काळ
“मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. बिहारमधल्या एका गावात माझ्या पाच भावंडांसोबत मी लहानाचा मोठा झालो. एका झोपडी असलेल्या शाळेत मी शिकलो. आमचं आयुष्य खूप साधं होतं . पण जेव्हा कधी आम्ही शहरात जायचो तेव्हा थिएटरमध्ये सिनेमा पाहायला नक्की जायचोच. मला अमिताभ बच्चन खूपच आवडायचे आणि मला अगदी त्यांच्यासारखंच बनायचं होतं. वयाच्या नवव्या वर्षीच मला समजलं होतं की अभिनयच माझी आवड आहे. मात्र स्वप्न पाहण्याची आमची ऐपत नव्हती आणि अभ्यासात लक्षही लागत नव्हतं. अखेर वयाच्या १७ व्या वर्षी मी दिल्ली युनिव्हर्सिटीत दाखल झालो. तिथे मी नाटकात काम केलं आणि हे माझ्या कुटुंबीयांना माहित नव्हतं. एकेदिवशी मी वडिलांना पत्र लिहून याबाबत सांगितलं. तेव्हा ते रागावले वगैरे नव्हते. उलट त्यांनी मला फी भरण्यासाठी २०० रुपये पाठवून दिले. मी कोणत्याच कामाच्या लायकीचा नाही असं आमच्या गावातले लोक म्हणायचे. पण त्याकडे मी दुर्लक्ष केलं. ”

आलेलं अपयश
“नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये (एनएसडी) प्रवेश घेण्यासाठी मी अर्ज केला. पण माझा अर्ज हा तब्ब्ल तीन वेळेस नाकारला गेला. तेव्हा मी आत्महत्याच करणार होतो. मी आत्महत्या करेन की काय या भीतीने माझे मित्र माझ्या बाजूलाच झोपायचे. ते कधीही मला एकटे सोडायचे नाहीत. माझा प्रवेश होईपर्यंत त्यांनी मला साथ दिली. त्यावर्षी मी एका चहावाल्याच्या दुकानात असताना तिग्मांशू धुलिया त्याच्या खटारा स्कूटरवर मला शोधत आला. शेखर कपूरने मला त्याच्या ‘बँडिट क्वीन’मध्ये भूमिकेची ऑफर दिली. तेव्हा मग मी मुंबईत राहायला आलो.”

मुंबईतला कठीण संघर्ष
“सुरुवातीला मुंबईत राहणं मला खूप कठीण होतं. पाच मित्रांसोबत मी एका चाळीत राहायचो. कामासाठी खूप शोधाशोध केली पण ऑफर काही मिळत नव्हती. एका सहाय्यक दिग्दर्शकाने तर माझा फोटोच फाडून फेकून दिला होता. एकदा तर एकाच दिवसात मी तीन प्रोजेक्टस गमावले होते. इतकंच नव्हे तर पहिल्या शॉटनंतर त्यांनी मला साफ निघून जाण्यास सांगितलं होतं. माझा चेहरा काही हिरोसारखा दिसणारा नव्हता म्हणून मी मोठ्या पडद्यावर काम करू शकेन असं त्यांना वाटत नव्हतं. कधी कधी घरभाडं भरण्यासाठीही पैसे नसायचे तर कधी साधा वडापावही खाण्यासाठी पैसे नसायचे. मात्र माझ्या पोटातली भूक मला माझ्या यशापर्यंत पोहोचण्याच्या भूकेला काही मारू शकत नव्हती. अखेर मला महेश भट्ट यांच्या टीव्ही सीरिअल मध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळी एका एपिसोडसाठी मला दीड हजार रुपये मिळायचे. त्यानंतर माझ्या कामाचं कौतुक झालं आणि मला ‘सत्या’ची ऑफर मिळाली.”

बिहार ते बॉलिवूड
“सत्या हा चित्रपट माझा आयुष्याला एकच कलाटणी देणारा ठरला. त्यांनतर मला पुरस्कार मिळू लागले. तेव्हा मी माझं पहिलं घर विकत घेतलं. ६७ चित्रपटांनंतर आज मी इथे आहे. स्वप्न पूर्ण करायचंच असं ठरवलं तर त्या मार्गात येणारा संघर्ष हा कधीही महत्त्वाचा ठरला नाही. महत्त्वाचा ठरला तो त्या नऊ वर्षांच्या एका बिहारी मुलाचा विश्वास… बाकी काहीही नाही.”

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment