७ स्थलांतरित मजुरांचं ‘धाडसी’ जगणं समजण्यासाठी ‘या’ चित्रपट निर्मात्यानेही १२०० किलोमीटरचा प्रवास केला..!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जीना इसी का नाम हैं | विनोद कापरी हे एक चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक असून त्यांनी मागील महिन्यात सात स्थलांतरित कामगारांसह उत्तरप्रदेशमधील ‘गाझियाबाद’ पासून बिहारमधील ‘सहारसा’ पर्यंत सात दिवस, सात रात्री प्रवास केला. हे माजी पत्रकार २०१८ च्या ‘पिहू’ या पुरस्कार प्राप्त चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शकदेखील आहेत. विनोद कापरी यांनी ‘आऊटलूक’शी स्थलांतरित कामगारांचा जिकिरीचा प्रवास, त्यांचे तणाव आणि आयुष्यातील चढउतार, आणि त्यांच्या कथेचा पाठपुरावा करण्यासाठी कशामुळे प्रेरणा मिळाली याविषयी संवाद साधला. इथे काही संपादित उतारे दिलेले आहेत.
 
प्रश्न :- आपण प्रवासाला सुरुवात कशी केली? 
उत्तर :- १३ एप्रिल रोजी मी ‘ट्विटर’वर ३०-४० स्थलांतरित कामगारांविषयी एक पोस्ट पाहिली होती. ते गाझियाबादच्या लोणी परिसरात अन्न आणि पैशाशिवाय अडकले आहेत अशी ती पोस्ट होती. मी त्यांच्यासाठी निधी जमा करण्यासाठी मदत केली. पण ३-४ दिवसांनी त्यांनी मला परत कॉल केला आणि पुरवठा संपला असल्याचं सांगितलं. त्यांनी असही सांगितले की ‘वारंवार अन्नाची विचारणा करायला लाज वाटत आहे.’ तो अतिशय स्वाभिमानी लोकांचा समूह होता. पुढच्या वेळी जेव्हा पुरवठा संपला तेव्हा त्यांनी बिहारच्या सहारसा इथे जाण्यासाठी काही मार्ग आहे का विचारले. मी त्यांना तुम्ही जाऊ नये असा सल्ला दिला आणि ही खूप धोकादायक कल्पना असल्याचेही सांगितले. या स्थितीत राहण्यापेक्षा वाटेवर मेलेले बरे असे ते म्हणाले. मी २७ तारखेला जेव्हा त्यांना कॉल केला तेव्हा त्यांच्यापैकी ७ जण आधीच निघून गेल्याचे त्यांनी सांगितले. मी गुगलवर सहारसाचे अंतर तपासले आणि ते १,२०० किलोमीटर असल्याचे पाहून मी घाबरून गेलो !! मला त्यांच्या प्रवासाचे दस्तऐवजीकरण करणे खूप आवश्यक वाटले. मी आणि माझी टीम आम्ही पुढच्या दिवशी सकाळी निघालो आणि आम्हाला ते संभल जवळ सापडले.

हे जगणं शूर आणि धाडसीच आहे..

प्रश्न :- तुमच्या प्रवासाबद्दल आम्हाला काय सांगाल?
उत्तर :- त्यांना पोलिसांनी मारहाण केली आणि ज्या दिवशी त्यांनी प्रवास सुरु केला त्याच दिवशी त्यांना परत जाण्यास सांगितले. त्यांनी पर्यायी मार्गाचा आधार घेतला. त्यांच्यापैकी एक जण तंत्रज्ञानाच्या खूप अधीन होता. त्याने पायी वाट शोधण्यासाठी ‘गुगल अर्थ ऍपचा’ वापर केला. त्याच रात्री त्यांनी गंगा नदी ओलांडण्याचा प्रयत्न केला. मच्छिमारांच्या एका समूहाने त्यांना अडवले आणि नदी किती खोल आहे याची काही कल्पना तरी आहे का? विचारले. जेव्हा मच्छिमारांनी त्यांना नदी ओलांडायला किती अडचण येते आहे ते सांगून त्यांना सकाळपर्यंत वाट पाहायला सांगितले आणि सकाळी नदीपलीकडे नेले. शिवाय त्यांच्याकडे सायकली होत्या आणि ते त्यांच्यासोबत पोहण्यासही सक्षम नव्हते. सायकल ही दुसरीच समस्या होती. त्यांनी त्यांच्या कुटुंबांकडे घरी परत येण्यासाठी पैसे मागितले होते आणि त्या वापरलेल्या (सेकंड हॅन्ड) सायकली खरेदी केल्या होत्या. आधीच या वाईट स्थितीत सायकलींना काही ना काही होत होते. त्यांना एखादा दुरुस्तीवाला माणूस सापडेपर्यंत अनेक किलोमीटर अंतर सायकलला पुढे ढकलत न्यावे लागले. 

रस्त्यातील प्रवासाचा एक क्षण

प्रश्न :- त्यांना इतर कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागले? 
उत्तर :- अन्न हा नक्कीच मुख्य मुद्दा होता. त्यांच्याकडे पैसे नव्हते. केवळ काही चने आणि सातू यांचा साठा होता. संचारबंदीमुळे सगळे हॉटेल बंद होते. आम्हाला कधी कधी एखादे किराणा दुकान मिळायचे आणि आम्ही तिथे ब्रेड आणि बटर घ्यायचो. किंवा फळ विक्रेत्याकडून केळी खरेदी करायचो. सात लोकांना एकत्र अंघोळ करताना पाहून कोणीही त्यांना सहज ओळखेल आणि पोलिसांना कळवेल आणि पुन्हा पोलीस येऊन त्यांना मारतील या भीतीने वाटेत त्या मजुरांनी अंघोळच केली नाही. उष्णता आणि घामामुळे त्यांना अंघोळ करण्याची कितीही गरज भासली तरी ते करू शकले नाहीत. डास आणि किटकांमुळे त्यांच्या अनेक रात्री हलाखीत गेल्या होत्या. 

प्रश्न :- त्यांना कोणी मदत केली का? 
उत्तर :-
होय. लखनऊला पोहोचल्यावर त्यांना खूप त्रास होऊ लागला. त्यांना अक्षरशः नको नको झालं होतं. त्यांच्या खांद्यावरून सायकल वाहून नेण्याने खांदा सुजला होता. एका ट्रकचालकाने त्यांच्यावर दया केली आणि जवळपास ३० किलोमीटर त्यांना ट्रकमधून नेले. मग त्यांनी पुन्हा सायकल चालविली. पुन्हा एका ट्रकचालकाने त्यांना गोरखपूरपर्यंत जवळपास १०० किलोमीतर अंतराची लिफ्ट दिली. त्यामुळे त्यांचा प्रवास थोडा चांगला झाला. जेव्हा ते बिहारच्या सीमेवर पोहोचले तेव्हा अजूनही त्यांच्या गावापर्यंत पोहोचण्यासाठी ३५० किलोमीटर अंतर बाकी होतं. तेव्हा कोरोनाच्या लक्षणांसाठी त्यांची तपासणी करण्यात आली. बिहार पोलिसांनी त्यांना संरक्षणामध्ये बसमधून त्यांच्या गावाशेजारच्या अलगाव केंद्रावर पाठवले. गावांमध्ये अलगाव केंद्रे बनविणे आणि स्थानिकांना तिथे ठेवणे ही चांगली गोष्ट बिहार सरकारने केली आहे. 

प्रश्न :- गावात पोहोचल्यावर त्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या? 
उत्तर :- ओह्ह, तो क्षण किती भावनिक होता हे मी सांगू शकत नाही. ते उत्साह आणि आनंदाने ओरडत होते. मी त्यांच्याबरोबर होतो आणि ते मला जिथे ते अंघोळ करायचे ते तळे, त्यांचे मंदिर, मक्याचे शेत हे सगळे दाखवत होते. ते एक सुंदर गाव होते. बस जेव्हा अलगाव केंद्राकडे जात होती तेव्हा त्यांच्या घरचे लोक रडत तिच्या पाठीमागे धावत होते. अलगावमध्ये जाण्यापूर्वी ते अगदी थोडक्यात त्यांना भेटले होते. पण त्यांचे कुटुंबीय त्यांच्याच गावात असल्याने ते खूप शांततेत होते. मी आणि माझ्या टीमने त्यांच्या गावात एक रात्र घालवली, त्यांच्या पाहुणचाराने आम्ही भारावून गेलो होतो. एकूण आमच्या प्रवासाचा शेवट आनंदी झाला. 

घरी पोहचल्यानंतर स्थलांतरित मजूर

प्रश्न :- कदाचित हे होणार नाही म्हणून रस्त्यावर तुम्ही चिंतेत होता का? 
उत्तर :-
यात काहीच शंका नाही, निरंतर आम्ही त्याच चिंतेत होतो मी मजुरांच्या रस्त्यातच कोसळणे, मृत्यू आणि अपघात इ.चे अहवाल वाचले होते. संचारबंदीमुळे रस्त्यावर कमी गर्दी होती, त्यामुळे ट्रक अधिक वेगाने पुढे जात होते. त्यांच्यापैकी कुणीही थकव्यामुळे किंवा ट्रकच्या भरघाव वेगात सायकलींवरचे नियंत्रण गमावून खाली कोसळू नये म्हणून मी देवाकडे प्रार्थना करत होतो.

प्रश्न :- वाटेत काही आनंदाचे क्षणही आले असतील? 
उत्तर :-
त्या ट्रकचालकाने चांगले १०० किलोमीटर अंतर ट्रकमधून नेल्यावर त्यांना खूप आनंद झाला होता. आम्ही एकत्र रात्रीचे जेवण केले. त्यानंतर त्यांनी आमच्यासाठी भोजपुरी गाणे गायले. मी ती सुंदर संध्याकाळ कधीच विसरू शकत नाही. आणि शेवटी जेव्हा मी गाव सोडत होतो, तेव्हा त्यांच्यापैकी ३ जण रडत होते. आम्ही नेहमीच संपर्कात राहण्याचे वचन एकमेकांना दिले आहे.

प्रश्न :- या प्रवासामुळे तुमच्यामध्ये काही बदल झाले का? 
उत्तर :- जेव्हा मी उपक्रमासाठी (assignment)  निघालो तेव्हा मला एक उत्सुकता होती, की कशामुळे लोक इतके अफाट निर्णय घेतात? मला हे धाडसी लोक कोण आहेत जे जाणून घ्यायचे होते आणि त्यांना जवळून पाहायचे होते. माझ्या घराचे दोन वेळा नूतनीकरण झाले आहे. आणि हे लोकसुद्धा असेच त्यांच्यासारखे होते ज्यांनी ते नूतनीकरण केले होते. मी आता त्यांच्याकडे पूर्णतः वेगळ्या दृष्टीने पाहतो आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे आम्हाला रस्त्यात वाईट लोकांपेक्षा जास्त चांगले लोक भेटले. केवळ स्थलांतरितांवर पोलिसांनी केलेल्या अत्याचाराची घटना मी माझ्या आठवणींमधून काढू शकतो का? ज्याने माझ्या आठवणी चांगल्या होतील. नाही. पंक्चर दुरुस्ती करणारा तो माणूस, ज्याने त्या कामगारांकडून पंक्चरचे ३० रुपये घ्यायलाही नकार दिला, तो मला आठवेल आणि खूप स्पष्टपणे आठवेल. आणि तो मिठाई दुकानवाला ज्याने त्या दिवशी केवळ चहा बनवला होता पण आमची गोष्ट ऐकल्यावर त्याने आमच्यासाठी सामोसे बनवले. आणि नक्कीच ते ट्रक ड्राइव्हर ज्यांनी मोठा धोका पत्करून त्यांना ट्रकमधून प्रवास करण्यास मान्यता दिली. जर पोलिसांनी त्यांना पकडले असते तर त्यांना २०,००० रु दंड भरावा लागला असता. अगदी ट्रकसुद्धा जप्त करून घेतले असते. तरीही जेव्हा त्यांनी गोष्ट ऐकली तेव्हा ते पाघळले आणि लिफ्ट देण्यास तयार झाले. या जगात वाईटापेक्षा नक्कीच चांगले अधिक आहे.

‘आऊटलूक’ माध्यमाच्या ऑनलाईन एडिशनसाठी सलीक अहमद यांनी विनोद कापरी यांची मुलाखत घेतली असून हॅलो महाराष्ट्रसाठी याचा अनुवाद जयश्री देसाई यांनी केला आहे. मूळ इंग्रजी लेखाची लिंक सोबत देत आहोत. अधिक संपर्कासाठी – 9561190500

मूळ इंग्रजी मुलाखतीची लिंक – https://www.outlookindia.com/website/story/india-news-film-maker-journeys-1200-kms-with-seven-migrant-labourers-to-understand-these-brave-people/352198

Leave a Comment