भगतसिंग – वाचनावर प्रेम करणारा अवलिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भगतसिंग जयंतिविशेष | वाचन प्रेम काही वेगळंच होतं. समाजवादाविषयी त्यांच्या मनात हळवा कोपरा असूनही त्यांनी कादंबर्या वाचण्याची, खासकरून राजकीय आणि आर्थिक विषयांबद्दल उत्कट इच्छा मनी धरलेली. डिकन्स (Dickens), अप्टन सिन्क्लेअर (Upton Sinclair), हॉल केन (Hall Caine), व्हिक्टर ह्यूगो (Victor Hugo), गॉर्की (Gorky), स्टेपॅनिक (Stepnik), ऑस्कर वाइल्ड (Oscar Wilde) आणि लिओनार्ड अँड्रयू (Leonard Andrew) हे त्यांचे काही आवडते लेखक. कादंबर्यांतल्या काही विशिष्ट पात्रांसमवेत भगतसिंग भावनात्मक-रित्या जोडले जायचे. काही काही वेळा त्या पात्रांसमवेत ते अक्षरशः रडायचे तर कधी मनमोकळे हसायचे.

क्रांती अभ्यासताना त्यांनी विनाकारण येणारं अकाली प्रौढत्व नाकारलं होतं. जगाला कलाटणी देणारी पुस्तकं वाचताना त्यांनी कथा – कादंबऱ्या आणि शेर-शायरीही मनसोक्त वाचली. त्याचा मनमुराद आनंद घेतला. गालिब यांची एक शायरी त्यांना प्रचंड आवडायची त्यांनी ती एका कागदावर उतरवून काढलेली.

यह न थी हमारी किस्मत जो विसाले यार होता,
अगर और जीते रहते यही इन्तेज़ार होता ।

तेरे वादे पर जिऐं हम तो यह जान छूट जाना,
कि खुशी से मर न जाते अगर ऐतबार होता ।

भगतसिंह शब्दशः पुस्तके खाऊन टाकायचे. ते पुस्तके वाचायचे, त्यातून नोट्स तयार करायचे, वाचलेल्या पुस्तकांबद्दल मित्रांसोबत चर्चा करायचे आणि ज्ञानाच्या नव्या प्रकाशात स्वतःच्या मान्यतेची-आकलनाची कठोर समीक्षा करायचे. सर्वंकष मंथनातून ज्या चुका सापडल्या त्या दुरुस्त करून घ्यायचे.

भगत सिंह कायम स्वतःसोबत एक छोटंसं फिरतं ग्रंथालय बाळगायचे. भगतसिंह यांनी आग्रा इथं सुमारे ७० लेखकांच्या सुमारे १७५ पुस्तकांचं एक ग्रंथालय स्थापन केलेलं. हे तेच ठिकाण जिथं असेम्ब्लीमध्ये बॉम्ब टाकण्याचं प्लॅन निश्चित करण्यात आला होता. क्रांतीची ठिणगी जी पडली तीही पुस्तकांच्या सानिध्यात असतानाच.

भगत सिंह स्वतः जे वाचत त्याबद्दल सर्वांशी चर्चा करत, त्यांनी जे वाचलं ते इतरांनीही वाचवं अशी त्यांची इच्छा असे. याच इच्छेमुळं त्यांनी आयरिश क्रांतिकारक डॅन ब्रिन यांची आत्मकथा “आयरिश स्वातंत्र्यासाठी माझा लढा” या पुस्तकाचा अनुवाद केला. इतरांनीही वाचावं यासाठी एवढं कष्ट वाचनावर नितांत प्रेम करणारा अवलियाच करू जाणो.

Leave a Comment