नक्षलवादाचे आव्हान – देवेन्द्र गावंडे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुस्तक परिचय – प्रणव पाटील

          खर तर मला नक्षलवाद रोमँटिक वाटायचा. कारण मी नक्षलवाद समजून घेण्याकरिता राहुल पंडीता यांचं हॅलो बस्तर हे पुस्तक वाचलं होते. त्यात खरं तर नक्षवादी चळवळीच्या सुरुवातीच्या काळातील माहीती दिलेली होती. ज्यात शिकलेले अनेक तरुण-तरुणी विशेषतः बंगालमधील झुंडीच्या झुंडीने नक्षलवादी बनून क्रांतीची स्वप्ने बघत होते पण जसजशी पोलिसीकारवाई सुरु झाली आणि नक्षलवादी तरुण मरु लागले तसतसे हे तरुण तरुणी आदिवांसींना उघड्यावर टाकून शहरात पळून गेले. त्यानंतर चळवळ कट्टर स्थानिकांच्या हातात गेली आणि हळूहळू ती अतिशय हिंसक होऊ लागली.

          प्रस्तुत पुस्तकाचे लेखक देवेन्द्र गावंडे यांनी स्वतः नक्षलग्रस्त भागात फिरुन खऱ्या खोट्या गोष्टी लोकांसमोर आणल्याआहेत. गर्द झाडीचा पडदा पांघरून उग्र गटविधी घडवणाऱ्या लाल फौजीची सत्यकथा देवेंद्र गावंडे यांनी रेखाटली आहे. नक्षलवादी चळवळीचे सचित्र वास्तव अगदी जस आहे तस मांडणारे हे पुस्तक आहे. २००४ साली नक्षलवादी म्होरक्या आझाद याने आबुजमाड डोंगरवर या वेगवेगळ्या नक्षली गटांना एकत्र करुन “भारतीय कम्युनिस्ट पार्टी – माओवादी” या झेंड्याखाली एकत्र रचना केली. दंडकारण्याचे वेगवेगळे विभाग पाडून नक्षल्यांचे दलम तैनात केले. खरं तर नक्षलवादी अशा घनदाट अरण्यात जागतात कसे? त्यांचे उत्पन्नाचे स्रोत कोणते यावर या पुस्तकात सविस्तर शोधा घेत माहीती मांडली आली आहे. सरकारतर्फे आदिवांसींना मिळणारे निम्मे धान्य हे नक्षलींना द्यावे लागते.तंदूपत्ता ठेकेदारांकडून मिळणारे हप्ते (हा सरा हिशोब काही कोटींच्या घरात आहे) हे पैसे चळवळीसाठी कशा प्रकारे वापरले जातता? शहरातील समर्थकांना कशा प्रकारे ते पुरवले जातात याचा लेखाजोखाच या पुस्तकात मांडला आहे.

           आपण अनेक वेळा वाचतो की पोलिस आदिवासींचा कसा गैरफायदा घेतात अनेकदा बलात्कारही करताता पण नक्षलीतर याच्या एक पाऊल पुढेच आहेत, चळवळीतील स्त्रीला काही वेळा भयानक परिस्थितीतून कसं जावं लागतं. पोलिसांचा खबरी असल्याच्या नुसत्या संशयामुळे कशा प्रकारे नक्षली आदिवासींचे अर्धवट गळे कापून तडफडवून मारतात. नक्षलींना खरं तर आदिवासींचा विकास नकोच आहे कारण त्यांचा विकास झाला तर नक्षली चळवळीची हवाच निघून जाईल म्हणून पक्के रस्ते, लाईट, नदीवरचे पूल, शाळा यांची कामे नक्षली बंद पाडतात…पण या नक्षलवाद्यांचे ऐकीकडे आश्चर्यच वाटतं इतक्या घनदाट जंगलातही ते रोज बीबीसी वरच्या जागतिक बातम्या ऐकतात तसेच तरुणांसाठी चालूघडामोडींचे बौध्दिक घेतले जाते. सैन्यालाही गुंगारा देत हे नक्षली अनेक दिवस उपाशी जंगलभर फिरत असतात आणि आपली यंत्रणा कार्यन्वित ठेवतात. या पुस्तकामुळे प्रथमच महाराष्ट्र प्रांताचा नक्षलवादी म्होरक्या मिलिंद तेलतुंबडे आणि सगळ्या नक्षलींचा सेनापती गणपती हे दोघे कसे दिसतात हे पहायला मिळाले.

या नक्षलवाद्यांचा सर्वाधिक प्रभाव पूर्वी तेलंगना प्रांतात होता परंतु आन्ध्र प्रदेश सरकारने ग्राऊंड हंट मोहीम आखल्या नंतर तिथे शेकडो नक्षली मारले गेले आणि त्यातील मुख्य नक्षली नेते हे छत्तीसगढ, झारखंड आणि महाराष्ट्र यांच्यातील समायिक असणाऱ्या दंडकारण्यात येऊन राहीले. त्यामुळे हा प्रदेश चळवळीचा केन्द्रक बनून राहीला आहे. आबूजमाड डोंगर त्यांची राजधानी आहे.जिथून गणपती हा नक्षली म्होरक्या सगळा कारभार पाहतो. आजही या चळवळीवर तेलगू नक्षलवाद्यांचा वरचष्मा आहे कारण यातील अनेक जण तेलंगणा प्रांतातील आहेत. म्हणूनच नक्षलींना आदिवासी आण्णा म्हणतात.

या पुस्तकातील सर्वांत भयानक वाचलेली गोष्ट ही पोलिस आणि सी.आर.पी.एफ च्या जवानांची आहे. सतत तणावग्रस्त भागात राहून अनेकांना वेड लागले. काहींनी या वेडापायी आत्महत्या केल्या तर काहीजण एकमेकांवर गोळ्या चालवल्या….अनेक जण रस्त्यावर वेड्यासारखं काहीतरी लिहीत बसतात तिथेच ओरडून रडतात अशा परिस्थितीत पोलिस आणि जवान तेथे गस्त घालत राहतात. आज दंडकारण्यात पोलिस स्टेशन हे किल्लेच झाले आहेत अशा प्रकारे असुरक्षितता तिथे गडद आहे. तसेच सरकारचा आदिवासींना हत्यारे देऊन सलवा जूडूमचा यशस्वी झालेला प्रयत्न पण सरकारनेच तो प्रयत्न बंद करुन हजारो आदिवासींना विस्थापित होण्यास कसे भाग पाडले याचा ठोकटाळा पुस्तक देते. तसेच एकाच घरातील दोन भावांपैकी एकजण नक्षलवादी आणि एक जण पोलिसात असतो अशीही उदाहरणे समोर येतात. नक्षलवादी चळवळ ही खरीतर एका उद्देशाने तयार झाली होती आणि आज ती स्वतः चं साम्राज्य टिकवण्यासाठीच कशी झगडतीये आणि यात कशाप्रकारे हजारो आदिवांसीचा बळी जातो.हे सध्याचे या चळवळीचे चित्र आहे. हे पुस्तक वाचल्या नंतर मी देवेन्द्र गावंडेनां नागपूरला फोन करुन त्यांनी या नक्षलवादी चळवळी बद्दलचे माझे डोळे उघडल्या बद्दल आभार मानले.

        तरीही नक्षलवाद्यांची दलम रचना,सांस्कृतिक नाट्य मंचाचे गावोगावी भरणारे जलसे,त्यात स्वतः ते तरुण तरुणी गाण्यातून सरकारवर टिका करुन नक्षल चळवळीत भरती होण्याचं आमंत्रण देतात. जनताआदालत यात सर्वांना समोर आरोपीची चौकशी होऊन शिक्षा दिली जाते. या विषयी नक्कीच अजूनही कूतूहल वाटते. या नक्षलवादी चळवळीत आज नवे तरुण भरती होत नाही.ही त्यांच्या समोरची प्रमुख काळजी आहे. तरी शहरीभागातील अनेक तरुण या चळवळीत सहभागी आहेत ही धोकादायकच गोष्ट आहे.यासाठी नक्षलवादी धूर्तपणे दलित कार्ड वापरताना दिसतात. परंतु त्यांनी केलेल्या सर्वांतधिक हत्या या दलितांच्याच आहेत हेही जगासमोर यायला हवं. भारतीय लोकशाहीचा प्राण असणारी निवडणूकही नक्षली या भागात होऊन देत नाही आणि तरीही कोणी या निवडणूकीत उभं राहीलं तर त्याला ठार केलं जातं. भारतीया समोर नक्षलवाद हा मोठा प्रश्न असला तरी शासनाला तो प्रश्न हताळणं अद्यापही जमलेलं नाही. कारण त्यात आदिवासी मागास राहण्यामागे जसा नक्षलींचा फायदा आहे तसाच आणखी हितसंबंधी गटांचाही त्यात फायदा आहे. त्यामुळे ज्यांच्यासाठी हा लढा उभारला होता ते आदिवासी मात्र या जंगलातून हळूहळू हद्दपार होताना दिसत आहेत.

पुस्तकाचे नाव – नक्षलवादाचे आव्हान
लेखक – देवेंन्द्र गावंडे
साधना प्रकाशन, पुणे
250 रु मूल्य

प्रणव पाटील

Leave a Comment