ब्रह्मानंद पडळकर यांच्या गाडीला भीषण अपघात, कार – टेम्पोची समोरासमोर जोरदार धडक

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे जेष्ठ बंधू आणि माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर यांची इनोव्हा गाडी आणि मालवाहतूक टेम्पो यांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. हा अपघात आज रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास विटा – कुंडल रस्त्यावर आळसंदजवळ घडला. या भीषण अपघातात ब्रम्हानंद पडळकर हे गंभीर जखमी झाले असून तातडीने विट्यातील ओमश्री हॉस्पिटलमध्ये उपचार करून पुढील उपचारासाठी सांगलीला हलविण्यात आले आहे.

या अपघाताची नोंद करण्याचे काम विटा पोलिसांत सुरू होते. आमदार गोपीचंद पडळकर यांचे मोठे बंधू ब्रम्हानंद पडळकर हे एका कार्यकर्त्यांच्या मुलीच्या साखरपुड्यासाठी विटा – कुंडल रस्त्याने निघाले होते. दरम्यान अचानक आळसंदजवळ मालवाहू टेम्पो आणि पडळकर यांच्या गाडीचा समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, यात ब्रम्हानंद पडळकर यांच्या गाडीच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला आहे.

या अपघातात ब्रम्हानंद पडळकर यांच्यासह जगन्नाथ पडळकर व चंद्रकांत पावणे तर मालवाहतूक टेम्पो चालक राहुल सुर्वे असे एकूण चौघेजण जखमी झाले आहेत. ब्रम्हानंद पडळकर यांच्यासह अन्य जखमीना तातडीने विट्यातील ओमश्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच आमदार गोपीचंद पडळकर हे मुंबई दौरा सोडून तातडीने विट्यात दाखल झाले.