महाशिवआघाडीच्या सरकारमध्ये कोण होणार मुख्यमंत्री? | स्पेशल रिपोर्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतिनिधी | सातारा

मुख्यमंत्रीपद – केंद्रातील सत्ताधारी पाशवी बहुमतात नसतील तर राज्याची मांड समर्थपणे हाताळू शकणारं स्वावलंबी व्यक्तिमत्व. अनेक राजकीय नेत्यांची संपूर्ण कारकीर्द गेली तरी या पदाचं स्वप्न पूर्ण होत नाही. घराणेशाही असेल तर मार्ग तुलनेनं सोपा असतो. दुसरा मार्ग म्हणाल तर पक्षश्रेष्ठींच्या मनात तुम्ही घर केलेलं असलं पाहिजे. आणि तिसरा मार्ग म्हणजे तुमचं स्वतःचं कर्तृत्व त्या पदाला लायक असायला हवं, राजकारणाचे छक्के-पंजे तुम्हाला माहीत असले पाहिजेत. महाराष्ट्र विधानसभा २०१९ ही त्या दृष्टीने बरीच रंजक ठरली आणि राज्याच्या प्रमुखाच्या निवडीसाठी सारी उलथापालथ अनुभवायला आली. भाजपने सत्ता स्थापन करणार नसल्याचा दावा केल्याने आणि संजय राऊत यांनी शिवसेना सत्तास्थापन करणार असल्याचा दावा केल्याने आता दोन ते तीन दिवसांतच महाराष्ट्राला नवा कोरा मुख्यमंत्री मिळणार आहे. महाराष्ट्रात निवडणूक काळात अस्तित्वात आलेल्या महाजनादेश, शिवस्वराज्य आणि जनआशिर्वाद यात्रांचं आता महाशिवआघाडीमध्ये रूपांतर झालं आहे. जुळून आलेल्या या नव्या समीकरणात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल याचा हॅलो महाराष्ट्रने घेतलेला प्राथमिक अंदाज..!!

१) एकनाथ शिंदे – मूळचे साताऱ्याचे असलेले एकनाथ शिंदे दीर्घकाळ ठाणे भागात वास्तव्यास आहेत. आनंद दिघे यांनी केलेली शिवसेनेची पायाभरणी अनुभवलेले एकनाथ शिंदे हे एक कार्यकर्ते आहेत. मनोहर जोशी आणि नारायण राणे यांच्यानंतर शिवसेनेचा तिसरा मुख्यमंत्री बनण्याची संधी एकनाथ शिंदे यांना चालून आली आहे. तोडफोडीच्या राजकारणावर भर असलेल्या एकनाथ शिंदे यांचं मागील ५ ते ८ वर्षांतील वागणं बरंच बदललं आहे. विधिमंडळ नेता म्हणून त्यांची केलेली निवड ही त्यांच्या शिवसेनेप्रति असलेल्या बांधिलकीची पावतीच आहे. असं असलं तरी संपूर्ण राज्यातच एकनाथ शिंदे यांचा चेहरा प्रभावी नाही. १९९५ मध्ये सत्तेचा रिमोट कंट्रोल हाती बाळगलेल्या बाळासाहेब ठाकरेंची भूमिका निभावण्यासाठी आता उद्धव ठाकरे पुढाकार घेतील. भरीस भर म्हणजे काँग्रेससहित १०० आमदारांचं पाठबळ उभं करणाऱ्या शरद पवार यांच्या निर्णयाचा आदर करणंही उद्धव ठाकरेंना अनिवार्य असणार आहे.

२) उद्धव ठाकरे – ज्या घराण्यातील माणसं निवडणुकीलाच उभी राहत नाहीत ते मुख्यमंत्र्यांपदावर हक्क कसा सांगणार असं एकूण चित्र असताना उद्धव ठाकरे यांनी मात्र २०१२ ते २०१८ कालावधीत मुख्यमंत्रीपदासाठी खूप कयास करून पाहिला. चुलतबंधू राज ठाकरे यांची पात्रता डावलून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धवच्या गळ्यात पक्षप्रमुख पदाची माळ घातली आणि तिथून पुढची सगळीच गणितं बिघडली. महाराष्ट्राच्या राजकारणात मराठी अस्मिता, हिंदुत्ववाद रुजवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ठाकरे कुटुंबाला मागील ५ वर्षांत भाजप सरकारने माघार घ्यायला भाग पाडलं आहे. पक्ष स्थापन होऊन पन्नाशी गाठलेली असताना शिवसेना अजूनही स्वबळावर निवडून येऊ शकली नसली तरी यंदाच्या निवडणुकीने सगळीच समीकरणं बदलली. हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन मागील ३० वर्षं एकत्र राहिलेल्या शिवसेनेने आता भाजपसोबतचा घरोबा कमी केला असून शिवसेना राष्ट्रवादीच्या प्रत्यक्ष तर काँग्रेसने बाहेरून दिलेल्या टेकुवर सत्तास्थापनेचा दावा करणार आहे. अशा परिस्थितीत आदित्य ठाकरेंच्या अनुभवाचा, अभ्यासाचा प्रश्न निर्माण झाल्यास उद्धव ठाकरे ही धुरा स्वतःच्या खांद्यावर घेऊ शकतात. त्यामुळे त्यांना आता मातोश्रीपेक्षा विधानभवनात आणि मंत्रालयात जायची तयारी जास्त ठेवावी लागेल.

३) अजित पवार – आघाडी सरकारच्या काळात केवळ काँग्रेस पक्ष मोठा आहे म्हणून उपमुख्यमंत्री पदावर अजित पवारांची बोळवण झाली. जलसंपदामंत्री हे खातं सांभाळत असताना अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोपही झाले. काकांच्या म्हणजेच शरद पवारांच्या मर्जीशिवाय त्यांचं राजकारणातील पान हलणार नाही हे माहीत असल्यामुळेच त्यांच्या मुख्यमंत्र्यांपदालाही मर्यादाच आल्या. पण यंदाच्या निवडणुकीने राष्ट्रवादीला पुनरुज्जीवित केलं आहे. झालं गेलं सगळं विसरून जाऊ म्हणत आता स्वच्छ प्रशासनाचा विचार अजितदादा करू शकतात. शिवसेनेसोबत सत्तेत भागीदारी असताना किमान काही काळाच्या मुख्यमंत्रीपदासाठी अजित पवारांचा विचार नक्कीच केला जाऊ शकतो. भाजपने माघार घेतल्याने आता ज्येष्ठ, अनुभवी आणि अभ्यासू नेता म्हणून पहिलं नाव अजित पवारांचंच पुढं येत आहे.

काँग्रेसचा पाठिंबा बाहेरून असल्याने त्यांच्या कोणत्या नेत्याला मुख्यमंत्रीपद मिळेल अशी सुताराम शक्यता नाही. आदित्य ठाकरे हे अजून सक्षम पर्याय वाटत नाहीत. त्यांना जर चुकून संधी दिलीच तर तोंड दाबून बुक्क्यांचा मार दिल्यामुळे चवताळून उठलेल्या भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि इतर नेते आदित्य ठाकरेंना सळो की पळो करून सोडल्याशिवाय राहणार नाहीत.

मी काय म्हातारा झालोय का? अजून लई जणांना घरी पाठवायचंय असं म्हणत मी पुन्हा येईन म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या झंझावाताला रोखण्याचं काम शरद पवारांनी करुन दाखवलं. लढवय्यापणा आणि मुत्सद्दीपणा काय असतो हे पवारांनी दाखवून दिलं. पवार आता कितीही नाही म्हणत असले तरी सध्याच्या घडीला जनतेच्या मनातील मुख्यमंत्री तेच आहेत हे मान्य करावंच लागेल.

Leave a Comment