राजकारणात आलेली वेळ परत येत नाही, सत्यजीत तांबेंचे आदित्य ठाकरेंना मैत्रीखातर पत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 टीम हॅलो महाराष्ट्र | युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदार संघातून चांगले मताधिक्य घेऊन विजयी झालेत. विधानसभा निकालानंतर भाजपला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने शिवसेनाच आता किंगमेकर ठरणार असल्याचं स्पष्ट झालंय. यापार्श्वभुमीवर शिवसेना मुख्यमंत्रीपद मागेल असं बोललं जात आहे. आदित्य ठाकरे मुख्यमंत्री पदाचे मुख्य दावेदार मानले जात आहेत. मात्र त्याचवेळी ठाकरे यांचं वय कमी असल्याने आणि विधानसभेचा अनुभव नसल्याने त्यांना अंतर्गत विरोधाला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. अशात युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मैत्रीखातर एक खुलेपत्र लिहिले आहे. तांबे यांनी लिहिलेले पत्र खालीलप्रमाणे

प्रिय आदित्यजी,

2007 सालची गोष्ट आहे. माझेही वय 24 चं होते. अहमदनगर जिल्हापरिषदेच्या निवडणुकीत मी काँग्रेसचा जिल्हापरिषद सदस्य म्हणून निवडून आलो होतो. जिल्हा परिषदेत कॉंग्रेसचे बहुमत झाले होते. बहुतांशी सदस्यांची इच्छा मी ‘अध्यक्ष’ व्हावा ही होती. मात्र जिल्ह्यातील काही नेत्यांना कुणाला तरी दुसऱ्यांना अध्यक्ष करायचे होते. बऱ्याच ओढाताणी नंतर सव्वा- सव्वा वर्षे अध्यक्षपद वाटण्याचे ठरले.

मी पहिले सव्वा वर्ष मागितले, मात्र सर्वजण मी लहान असल्याने दुसऱ्या सदस्याला पहिले अध्यक्ष करण्याच्या मनस्थितीत होते. सर्वांचे म्हणणे होते, ‘सत्यजीतला, थोडा अनुभव मिळेल व तो सव्वा वर्षांने चांगले काम करेल’. पुढे सर्व जिल्हा मला ‘भावी अध्यक्ष’ म्हणून लागला. बोलता बोलता सव्वा वर्ष संपलं, ज्यांना अध्यक्ष केलं होतं त्या काही केल्या राजीनामा घ्यायला तयार नाही झाल्या.

पुढे अडीच वर्षाने पुन्हा जिल्हापरिषद अध्यक्षाची निवडणूक झाली. पुन्हा काँग्रेस पक्षाने मला अधिकृत उमेदवारी दिली, पुन्हा काहीतरी कारण सांगून त्याच विद्यमान अध्यक्षांनी सेना-भाजपच्या मदतीने माझा पराभव केला.

हे सर्व सांगण्याचा खटाटोप ह्यासाठी की, राजकारणात आलेली वेळ परत येत नाही. संधीही पुन्हा दरवाजा ठोठावेलंच याची खात्री नाही. म्हणून एक मित्र म्हणून एवढाच सल्ला आहे, जे मिळवायचे आहे ते आत्ताच मिळवा, कुणावरही विसंबून राहू नका. लहान म्हणून थांबवण्याचा प्रयत्न केला तरी थांबू नका, एवढीच विनंती.

आपलाच,
सत्यजीत तांबे

1 thought on “राजकारणात आलेली वेळ परत येत नाही, सत्यजीत तांबेंचे आदित्य ठाकरेंना मैत्रीखातर पत्र”

Leave a Comment