मंत्रीपदासाठी नव्हे, विकासकामांसाठी सरकारविरोधात संघर्ष करणार – अनिल बाबर यांची नाराजी उघड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी | आपण मंत्रीपदासाठी इच्छूक होतो ही गोष्ट खरी आहे, मात्र मंत्रीपद मिळाले नाही म्हणून आपण नाराज नाही. आपली नाराजी आहे ती जनतेची कामे थांबल्याबद्दल. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आता हेच खाते हवे, असे म्हणण्यापेक्षा तातडीने खातेवाटप करुन प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली पाहिजे असा घरचा आहेर शिवसेनेचे अनिल बाबर यांनी विटा येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दिला.

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यानंतर अनिल बाबर कोणती भूमिका घेणार? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. मात्र बाबर यांनी आपली नाराजी कामाबद्दल असल्याचे स्पष्ट केले. मंत्रीपद मिळाले नाही म्हणून मंत्रीपदासाठी संघर्ष करणारांपैकी मी नाही, संघर्ष करावा लागला तर तो मतदारसंघाच्या मूलभूत प्रश्‍नांसाठी आणि विकासासाठी नक्कीच करणार आहे. त्यासाठी मी अजिबात मागे पुढे पाहणार नाही.

मी आमदारकीसाठी निवडणूक लढविली होती, मंत्रीपदासाठी लढविली नव्हती. तरीही मी मंत्रीपदासाठी इच्छुक होतोच. ते आता लपवून ठेवणारही नाही पण “वक्त से पहिले और किस्मत से ज्यादा कुछ नहीं मिलता” हे मला पक्के ठाऊक आहे. मला निवडणूकीत शिवसेनेसारखेच भारतीय जनता पार्टी, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंडळीनीही सहकार्य केले आहे. त्यांच्याशी बांधील राहणे ही माझी नैतिक जबाबदारी आहे, असेही अनिल बाबर म्हणाले.

अंतिमक्षणी आमदार अनिल बाबर यांचे राज्यमंत्रीमंडळातून नाव वगळल्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांच्यात नाराजीचा सुर उमटत होता. या पार्श्‍वभूमीवर खानापूर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या पंचफुला मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभूते, दिनकरदादा पाटील, तानाजीराव पाटील, पै. चंद्रहार पाटील, अमोल बाबर, सुहास बाबर, महावीर शिंदे, मनीषा बागल,नीलम सकटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Leave a Comment