भूमिपूजना आधीचं विघ्न! राम जन्मभूमीच्या मुख्य पुजाऱ्यासहीत १६ पोलिसांना कोरोनाची लागण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अयोध्या । राम जन्मभूमी मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याच्या (Bhoomi Pujan in Ayodhya) तयारीला वेग आलेला असतानाच या कार्यक्रमावर कोरोनाचे संकट घोंघावत आहे. आता येथील मुख्य पुजाऱ्याबरोबच सुरक्षेसाठी तैनात असलेल्या १६ पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रामजन्मभूमीच्या जागेची पूजा करणारे पुजारी प्रदीप दास यांच्या कोरोना चाचणीचे निकाल पॉझिटीव्ह आले आहेत. आचार्य सत्यंद्र दास यांचे शिष्य असणारे प्रदीप हे रामजन्मभूमीच्या प्रमुख ४ पुजाऱ्यांपैकी एक आहेत.

प्रदीप दास यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना होम क्वारंटीन राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या बरोबरच राम जन्मूभूमीच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या आणि कोरोना विषाणूची लागण झालेल्या १६ पोलिस कर्मचाऱ्यांना देखील क्वारंटीन करण्यात आले आहे. दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार बुधवारी अयोध्येमध्ये कोरोनाचे ६६ नवे रुग्ण आढळून आले होते. आतापर्यंत अयोध्येत ६०५ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ३७५ करोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अयोध्या जिल्ह्यात कोरोनामुळे १३ जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असा पार पडणार भूमिपूजन सोहळा
राम जन्मभूमी मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रम ५ ऑगस्टला आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह २०० लोक या सोहळ्यात सहभाग घेणार आहेत. कोरोनाच्या उद्रेकामुळे अधिक लोकांना आमंत्रण दिले जात नाही आहे. फक्त निवडक लोकांनाच भूमिपूजन कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात आले आहे. या भूमिपूजन सोहळ्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबरोबरच अन्य मान्यवरही उपस्थित असणार आहेत. राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या वतीने या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन केलं जाणार आहे.

कोरोनाच्या संसर्गामुळे भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी राम जन्मभूमी परिसरात ५०-५० लोकांचे वेगवेगळे ब्लॉक्स तयार करण्यात येत आहेत. यामध्ये केवळ २०० व्यक्ती बसू शकणार आहेत. देशातील ५० मोठे साधू या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत. त्याच प्रमाणे देशातील ५० मोठे नेते आणि राम जन्मभूमी आंदोलनात सहभागी असलेले नेते येथे उपस्थित राहणार आहेत. यात लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती आणि कल्याण सिंह यांचा समावेश आहे. राम मंदिराच्या बांधकामासाठी भूमीपूजन येत्या ५ ऑगस्टला होणार आहे. मात्र असे असले तरी ३ ऑगस्टपासून अयोध्येत या महोत्सवाला प्रारंभ होईल. येथे दिवाळीसारखे वातावरण दिसणआर आहे. यावेळी प्रशासनाकडून शहरात लाखो दिवे जाळण्यात येणार आहेत. तसेच सर्वसामान्यांना त्यांच्या घराबाहेर दिवे जाळण्याचे आवाहनही करण्यात येणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment