बीड मधील लढतींचे चित्र स्पष्ट, महायुती मधील गेवराईची बंडखोरी वगळता ‘बंड थंड’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड प्रतिनिधी। गेवराई वगळता बीड जिल्ह्यात ‘महायुती’मधील सर्व बंडखोर नेत्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. यामुळे बीड मधील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बंडखोरांनी आपली तलवार म्यान केल्यामुळे पाच मतदार संघात दुरंगी लढत होणार असे चित्र स्पष्ट झाले आहे. तर गेवराई मतदारसंघात शिवसेनेचे माजी मंत्री बदामराव पंडित यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवल्यामुळे या ठिकाणी भाजपचे विद्यमान आमदार लक्ष्मण पवार यांच्या अडचणीत वाढल्या आहेत. या मतदारसंघात भाजप – राष्ट्रवादी आणि अपक्ष अशी तिरंगी लढत होईल. तरी देखील बीड जिल्ह्यातील सहाही मतदारसंघात एम आय एम आणि वंचित बहुजन आघाडी ने उमेदवार उभे केले आहेत. तसेच बीड मतदारसंघामध्ये संभाजी ब्रिगेड देखील मैदानात आहे. यात बीड हा मराठा बहुल मतदारसंघ आहे. यामुळे मतांचे विभाजन होवून निवडणूक रंगतदार होणार आहे हे स्पष्ट झाले आहे.

बीड जिल्ह्यात केज, परळी, माजलगाव, आष्टी या चार मतदारसंघांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात दुरंगी लढत आहे. तर बीड मधे काका पुतण्यांमध्ये  शिवसेना – राष्ट्रवादी यांच्यात काटे कि टक्कर आहे. मात्र मत विभाजनासाठी संभाजी ब्रिगेड, एम आय एम , वंचित बहुजन आघाडी यांची भूमिका महत्वाची असेल. गेवराईत मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेस – भाजपा आणि अपक्ष शिवसेनेचे बंडखोर नेते अपक्ष उमेदवार बदामराव पंडित यांची तिरंगी लढत असेल. या ठिकाणी देखील वंचित चा उमेदवार आहे. परळी मध्ये धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे या बहीण भावात प्रतिष्ठेची लढाई होणार आहे.

माजलगाव मध्ये राष्ट्रवादीचे माजी मंत्री प्रकाश सोळुंके यांच्यासमोर भाजपचे रमेश आडसकर यांचे आव्हान आहे. नुकतेच भाजपा मध्ये प्रवेश केलेल्या मुंदडा कुटुंबामधील नमिता मुंदडा आणि राष्ट्रवादीने माजी आमदार पृथ्वीराज साठे यांच्यात सरळ लढत आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी वचपा काढण्यासाठी एकवटलेली आहे.आष्टी मतदार संघात भाजपा मधील गट बाजीचे प्रदर्शन झाले होते. तात्पुरते बंड थंड झाले असले तरी विद्यमान आमदार भीमराव धोंडे यांच्या समोर पेच कायम आहेच. यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीचे बाळासाहेब आजबे हे मैदानात आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपचे माजी मंत्री आ. सुरेश धस यांचे पुत्र जयदत्त धस यांनी आष्टी मधून तर भाजपचे राजेंद्र मस्के यांनी बीड मतदारसंघातून उमेदवारी मागे घेतली. मात्र त्याच वेळी शिवसेनेचे बंडखोर माजी मंत्री बदामराव पंडित यांनी आपला अर्ज कायम ठेवल्याने गेवराई मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार लक्ष्मण पवार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

इतर काही बातम्या-

Leave a Comment