अंदाधुंद गोळीबाराने भुसावळ हादरले; भाजप नगरसेवकासह कुटुंबातील चौघे ठार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव प्रतिनिधी । पूर्ववैमनस्यातून करण्यात आलेल्या हल्ल्याने रविवारी रात्री भुसावळ शहर हादरले. भाजपाचे नगरसेवक रवींद्र खरात उर्फ हंप्या यांच्यावर तीन जणांनी अंदाधुंद गोळीबार केला. यात रवींद्र खरात (५०), त्यांचे बंधू सुनील बाबूराव खरात (५५), मुलगा सागर रवींद्र खरात (२४), रोहित उर्फ सोनू रवींद्र खरात (२०) असे चौघेजण ठार झाले आहेत तर इतर चौघे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. आरोपीही या चकमकीत जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

भाजपाचे नगरसेवक रवींद्र खरात हे भुसावळमधील समता नगर येथे राहतात. रविवारी रात्री पावणे दहा वाजता चार हल्लेखोरांनी खरात यांच्या घराच्या अंगणात येऊन अंधाधुंद गोळीबार करण्यास सुरूवात केली. त्यामुळे खरात यांच्या कुटुंबियांची एकच धावपळ उडाली. या गोळीबारात खरात यांचे बंधू सुनील खरात आणि त्यांचा मुलगा सागर यांचा जागीच मृत्यु झाला. तर स्वत: रवींद्र खरात आणि त्यांचा मुलगा रोहित खरात हे उपचारादरम्यान मरण पावले. या हल्ल्यात रवींद्र खरात यांची पत्नी रजनी खरात, दुसरा मुलगा हितेश आणि अजून एकजण असे चारजण गंभीर जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अचानक झालेल्या या गोळीबाराच्या घटनेने भुसावळ शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. त्यात हल्ला करणाऱ्या आरोपींची नावे समोर आली. त्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक केली. आरोपींनी हल्ला केल्यानंतर खरात यांच्या कुटुंबियानीही गोळीबार केला. त्यामुळेच हे तिघे जखमी झाले. जुन्या वादातून हा हल्ला करण्यात आला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या –

Leave a Comment