मुंबई, महाराष्ट्राकडे दुर्लक्ष, स्वप्नांच्या दुनियेमध्ये रमवणारा अर्थसंकल्प – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : “केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प हा देशाच्या सध्याच्या आर्थिक स्थितीशी फारकत घेतलेला आणि वास्तवाचे भान हरपून देशातील युवा, शेतकरी आणि सर्वसामान्य माणसांना केवळ स्वप्नांच्या दुनियेत रमवणारा आहे,” अशी बोचरी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

महाराष्ट्राची घोर निराशा

“या अर्थसंकल्पाने देशाचे ग्रोथ इंजिन असलेल्या मुंबई आणि महाराष्ट्रावर पूर्ण अन्याय केला आहे. मुंबईतील पायाभूत सुविधांच्या विकासाला, मेट्रोला अपेक्षित असलेले अर्थबळ या अर्थसंकल्पातून दिले गेल्याचे दिसून येत नाही. उपनगरीय सेवा ही मुंबईकरांची लाईफ लाईन आहे. तिचा आणि प्रस्तावित रेल्वे लाईनच्या विकासाचा कुठलाही उल्लेख अर्थसंकल्पात नाही. दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे आणि मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या जुन्याच उल्लेखांशिवाय या अर्थसंकल्पाने राज्यातील रेल्वे विकासाला कोणतीही गती दिलेली दिसत नाही.”

मुंबईकडे पूर्ण दुर्लक्ष

“देशात पाच हिस्टॉरिकल साईटचा “आयकॉनिक साईट” म्हणून पुनर्विकास करण्याचा संकल्प अर्थमंत्र्यांनी केला आहे, त्यात सांस्कृतिक दृष्टीने संपन्न असलेल्या महाराष्ट्राच्या कोणत्याही साईटचा उल्लेख नाही. महाराष्ट्राबाबतचा हा दुजाभाव ठळकपणे या अर्थसंकल्पातून दिसून आला आहे. गुजरातमधील आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्राला अधिक बळकटी देताना मुंबईसारख्या देशाच्या विकासात सर्वाधिक योगदान देणाऱ्या शहराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचेही दिसून येते. याची खंत मुंबईकर आणि महाराष्ट्राला नेहमी राहील,” असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या अर्थसंकल्पावरील प्रतिक्रियेत म्हटले.

अन्नदात्याला केवळ स्वप्न

“शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा जुना मानस अर्थसंकल्पात नव्याने मांडण्यात आला. अन्नदात्याला उर्जादाता करण्याचे स्वप्न दाखवले. 15 लाख शेतकऱ्यांचे कृषी पंप सोलरवर आणण्याचा मनोदय व्यक्त केला. कार्बन उत्सर्जन कमी करणारे थर्मल पॉवर बंद करणार असल्याचे सांगितले. पण नेमक्या या गोष्टी कधी पूर्णत्वाला जाणार, थर्मल पॉवर बंद केल्याने निर्माण होणारी वीजेची तूट कशी भरुन काढणार याची स्पष्टता होताना दिसत नाही.”

Leave a Comment