भिवंडीत ३ मजली इमारत कोसळली; ८ जण ठार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | भिवंडीमध्ये पटेल कंपाउंड परिसरात एक तीन मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी २० ते २५ जण दबले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे. स्थानिकांनी २० जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढून वाचवले. मात्र आणखी काहीजण ढिगाऱ्यात अडकल्याची शक्यता आहे. एनडीआरएफ, अग्नीशमन दल, पोलीस, वैद्यकीय पथक आणि स्थानिक नागरिक मदतकार्यात गुंतले आहेत.

एनडीआरएफची टीम तंत्रज्ञानाच्या मदतीने ढिगाऱ्यात अडकलेल्यांचा शोध घेऊन त्यांना वाचवण्यासाठी मदतकार्य करत आहे. इमारतीत तीन मजले आणि २१ फ्लॅट (२१ घरे) आहेत. इमारत रात्री कोसळली, त्यावेळी सर्व घरात रहिवासी झोपलेले होते. याच कारणामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास इमारत कोसळली. ही इमारत जिलानी अपार्टमेंट या नावाने ओळखली जात होती. जिलानी अपार्टमेंट १९८४ मध्ये बांधण्यात आली होती. याआधी २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात महाड येथे एक पाच मजली इमारत कोसळली होती. या दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला होता.

विशेष म्हणजे महाडच्या दुर्घटनेनंतर भिवंडी मनपाने शहरातील इमारतींच्या बांधकामाचा दर्जा तपासण्यासाठी स्ट्रक्चरल ऑडिट केले होते. या ऑडिटमध्ये जिलानी अपार्टमेंटची तपासणी झाली होती का, हे अद्याप समजलेले नाही. या प्रकरणात चौकशी करुन दोषींवर कारवाई केली जाणार आहे.

महाराष्ट्रात कोरोना संकट आहे. आतापर्यंत राज्यात १२ लाख ८ हजार ६४२ कोरोनाबाधीत आढळले आहेत. यापैकी २ लाख ९१ हजार २३८ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. ठाणे जिल्ह्यात २९ हजार ६५४ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. महामारीचे संकट सुरू असतानाच इमारत कोसळल्यामुळे ठाणे जिल्ह्यातील वैद्यकीय यंत्रणेवर ताण आला आहे. दुर्घटनेतील जखमींना कोरोनाचा धोका निर्माण होऊ नये यासाठी पुरेशी खबरदारी घेतल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली.

Leave a Comment