CAA वरून उत्तर-पूर्व दिल्लीत हिंसेचा आगडोंब; वाहनांची जाळपोळ,एका पोलीस जवानाचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) विरोधात रविवारी दिल्लीच्या जाफराबादमध्ये सुरू झालेल्या वादाचे आज हिंसाचारात रूपांतर झाले. नागरिकत्व कायद्याचे विरोधक आणि समर्थक यांच्यात हिंसक चकमक उडाली. एकमेकांवर दगडफेक करण्यात आली. जाफराबाद ते मौजपूर दरम्यान जाळपोळ केल्याच्या घटना घडल्या. ही घटना मौजपूर मेट्रो स्थानकाजवळील कबीर नगर परिसरातील आहे. हा भाग मुस्लिम बहुल असल्याची माहिती मिळत आहे. या हिंसाचारात एका सामान्य नागरिकाच्या मृत्यूबरोबर  भजनपुरा जवळील चांदबाग येथे रतनलाल नावाच्या पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर आजच्या हिंसाचारात शाहदराचे डीसीपी अमित शर्माही जखमी झाले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठीमोठ्या संख्येने निमलष्करी दलाला पाचारण करण्यात आलं आहे. ईशान्य दिल्लीत पोलिसांनी १० ठिकाणी संचारबंदी लागू केली आहे. जाफराबाद व आसपासची अनेक मेट्रो स्थानके बंद करण्यात आली आहेत.

ईशान्य दिल्लीतील जाफराबाद आणि मौजपूर भागात आंदोलकांनी किमान दोन घरे पेटवून दिल्याने तणाव आणखी वाढला आहे. या भागात सोमवारी सलग दुसर्‍या दिवशी सीएए समर्थक आणि सीएए विरोधी गटांमध्ये हिंसक चकमक उडाल्या. दंगेखोरांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. पोलिसांनी दोन्ही गटांना शांत करण्याचा प्रयत्नही केला.

 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंसाग्रस्त परिसरात आग विझवताना आंदोलकांनी अग्निशमन इंजिनलाही नुकसान केले. दिल्ली मेट्रोने जाफराबाद तसेच मौजपूर-बाबरपूर स्थानकांमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रवेश व एक्झीट गेट बंद केले. जाफराबाद मेट्रो स्थानकाचे प्रवेश व एक्झिट गेट गेल्या 24 तासांपासून बंद आहेत. सुधारित नागरिकत्व कायद्याचा विरोध करणाऱ्या नागरिकांनी मोठ्या संख्येने रविवारी रास्ता रोको केला होता. त्यानंतर
जाफराबादमध्ये सीएएचे समर्थक आणि विरोधक यांच्यात संघर्ष सुरू झाला. दिल्लीतील इतरही अनेक भागात याच प्रकारची आंदोलन सुरू आहेत.

मौजपुरात भाजप नेते कपिल मिश्रा यांनी तीन दिवसात पोलिसांनी सीएएविरोधी निदर्शकांना हटवावे या मागणीसाठी बैठक बोलावली होती. त्यानंतर लगेचच दोन्ही गटातील सदस्यांनी एकमेकांवर दगडफेक करायला सुरुवात केली. ज्यामुळं पोलिसांना अश्रुधुराचा वापर करावा लागला.

दरम्यान, दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (डीएमआरसी) सोमवारी सकाळी ट्विट केले की जाफराबाद आणि मौजपूर-बाबरपूर मेट्रो स्थानकांचे एक्झीट व प्रवेशद्वार बंद आहेत. या स्थानकांवर मेट्रो थांबणार नाही. आतापर्यंत गेट उघडण्याबाबत डीएमआरसीने कोणतीही माहिती दिली नाही. जाफराबाद मेट्रो स्टेशन जवळील सीएएविरोधी शेकडो निदर्शकांनी सीलमपूर, मौजपूर आणि यमुना विहारला जोडणारा रस्ता रोखल्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

caa-protest-clash-in-bhajanpura-area-of-north

Leave a Comment