नवख्या उमेदवाराला स्वीकारलं, यातच मतदारांचे मोठेपण – चंद्रकांत मोकाटे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतिनिधी । प्रफुल्ल पाटील

मतदानाची तारीख जवळ येतीय तसतसे प्रचाराची धुरा असणारे नेते, उमेदवार आपला मतदार संघ पिंजून काढत आहेत. विधानसभा निवडणुकीचं काय होईल हे येत्या २४ तारखेला स्पष्ट होईलच. हॅलो महाराष्ट्रच्या वाचकांसाठी आम्ही काही जुन्या निवडणुकीच्या किस्स्यांचा मागोवा घेतला. कोथरुड विधानसभा मतदारसंघाचे २००९ ते २०१४ या काळात विधानसभेत प्रतिनिधित्व करणाऱ्या माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

“ती निवडणूक खऱ्या अर्थाने मला बरच काही शिकवून गेली. माझ्यासारख्या नवख्या कार्यकर्त्याला स्वीकारलं यातच मतदारांचे मोठेपण मला दिसलं. ती निवडणूक एक चॅलेंज म्हणून आम्ही सगळ्यांनी स्वीकारली. मतदारसंघ तसा खूप मोठा नव्हता पण मतदार संघ पुनर्रचनेमुळे बऱ्याच भागाचे चित्र अस्पष्ट होते. त्यामुळे पदयात्रा जास्त प्रमाणावर घेतल्या. अगदी एक – एक सोसायटी,गल्लीबोळ फिरून पालथी घातली. मतदारांच्या प्रत्येक अडचणीचे टिपण घेतले. असंख्य अडचणींचा पाढाच मतदारांनी वाचला होता. या अडचणी भविष्यात कशा सोडवता येतील याचा विचार करूनच आम्ही पुढचं नियोजन करायचो.

प्रचार करताना सकाळी लवकर सुरवात करायचो. आज कुठं जायचय, कशा पद्धतीने जायचंय याची सगळी माहिती सकाळी कार्यालयात जाऊन मी घ्यायचो.  सगळे कार्यकर्ते जमलेले असायचे. त्या सगळयांच्या चेहऱ्यावरचा उत्साह बघून मलाही खूप उत्साह यायचा. रात्री उशिरापर्यंत काम करण्याची ऊर्जा मला त्यातून मिळायची. आमच्यासाठी लोक आपल्या हातातली कामं सोडून यायची. एक चांगला व्यक्ती आपल्या मतदासंघातील अडचणी सोडवू शकतो या आशेनं लोक तुमच्याकडे बघतात त्यावेळी खूप मोठी जबाबदारी तुमच्यावर असते. म्हणून लोक हेच आपले मायबाप आहेत असं मी मानतो. या भावनेमुळेच मला लोकांसाठी काहीतरी करायची प्रेरणा मिळाली. लोकांची सुख – दुःख आपलेच मानून मी कामाला लागायचो. सामान्य व्यक्तीला कधीही मदत लागली तर ती कशी सोडवता येईल आणि माझ्यापर्यंत कसे पोहोचता येईल याची व्यवस्थित सोय मी करून ठेवली होती.

लोक्रतिनिधी हा लोकांमधला असावा, लोकांच्या प्रत्येक अडचणीची जाण असणारा असावा हे माझे मत मी त्यावेळीही पाळले आणि आजही पाळतो. कुणीही सर्वसामान्य माझ्याकडे अडचण घेऊन आला तर ती मी माझ्यापरीने होईल तशी सोडवण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी सगळ्याच शिवसैनिकांनी, भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी माझा प्रचार कुठलीही अपेक्षा न ठेवता प्रामाणिकपणे केला यातच मला सगळे काही मिळाले. हीच बाब मला चंद्रकांत दादांच्या बाबतीतही जाणवली. एवढं मोठं व्यक्तिमत्व असूनही सर्वसामान्य लोकांमध्ये दादा खूप आत्मीयतेने मिसळतात हेच दादांचे वेगळेपण आहे. माझ्या आजवरच्या सगळ्याच वाटचालीत मतदारांचा,शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा खूप मोलाचा वाटा आहे.

Leave a Comment