दत्तात्रय भरणेंनी हर्षवर्धन पाटलांना पुन्हा केले ‘चितपट’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी । इंदापूरमधून भाजपने हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, राष्ट्रवादीने इंदापूरचा गड राखला असून येथून दत्तात्रय भरणे यांचा विजय झालाय. शरद पवारांनी इंदापूर मतदारसंघात सभा घेऊन हर्षवर्धन पाटील यांच्याशी मी संपर्क साधल्याचं सांगतिलं होतं. तसच, दत्तात्रय भरणेंना विजयी करण्याचं आवाहनही इंदापूरकरांना केलं होतं. पवारांच्या झंझावती दौऱ्याचा आणि इंदापूरमधील सभेचाही भरणेंना फायदा झाला. तसेच, हर्षवर्धन यांचं भाजपात जाणं इंदापूरकरांना रुचलं नसल्याचं दिसून येतंय.

सन २०१४ साली तत्कालीन काँग्रेसमधून पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दत्तात्रय भरणे यांनी पराभव केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या सांगण्यावरून त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यासाठी लोकसभा निवडणुकीत काम केले. मात्र, त्यावेळी त्यांना आघाडीतर्फे उमेदवारी देण्याचे वचन पाळले जाईल, याची शाश्वती न मिळाल्याने त्यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला.

अनेक वर्ष काँग्रेसचे नेते आणि मंत्री म्हणून मंत्रिमंडळात काम केलेल्या पाटील यांच्या प्रवेशाने अनेकांना धक्का बसला होता. त्यामुळे या मतदारसंघातील निवडणूक ही हाय व्होल्टेज आणि लक्षवेधी ठरली होती. राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप करत हर्षवर्धन पाटलांनी काँग्रेसला रामराम केला. त्यावेळी, सुप्रिया सुळेंनी हर्षवर्धन पाटलांवर कडक शब्दात टीका केली होती. त्यातच, हर्षवर्धन पाटलांना पराभूत करण्याचा चंगच राष्ट्रवादीने बांधला होता. अखेर, दत्तात्रय भरणेंनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव करत भाजपला धक्का दिला. राष्ट्रवादीचा गड राखण्यात भरणेंना यश आले आहे.

Leave a Comment