दिल्ली विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र। दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांची तारीख जाहीर असून येत्या ८ फेब्रुवारीला मतदान पार पडणार आहे तर ११ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. दिल्ली विधानसभेच्या एकूण ७० जागांसाठी एकाच टप्प्यात होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी पत्रकार परिषदेत दिली. निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच राज्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.  दिल्लीत एक कोटी ४६ लाख मतदार आहेत.

निवडणूकी संदर्भातील १४ जानेवारीला अधिसूचना जारी होणार असून २२ जानेवारीपर्यंत उमेदवारांच्या अर्जांची छाननी करण्यात येईल. २४ जानेवारीपर्यंत उमेदवार आपला अर्ज मागे घेऊ शकतात. पुढील महिन्यात दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. दिल्लीत एकाच टप्प्यात सर्व ७० जागांसाठी मतदान होणार आहे. दिल्लीत १५ फेब्रुवारीपासून केंद्रीय माध्यमिक शैक्षणिक बोर्डाच्या परीक्षा सुरु होणार आहेत. त्यामुळे त्यापूर्वीच दिल्ली विधानसभेचा निवडणूक कार्यक्रम आटोपता घेतला आहे. ही निवडणूक पार पाडण्यासाठी ९० हजार अधिकारी तैनात असतील.

दिल्ली विधानसभेसाठी २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत केजरीवालांच्या नेतृत्त्वातील आपने एकहाती बाजी मारली होती. आपने ७० पैकी तब्बल ६७ जागी विजय मिळवला होता. भाजपला केवळ ३ जागाच जिंकता आल्या होत्या. या निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नव्हती. भाजपला विधानसभेत यश मिळालं नसलं, तरी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने मुसंडी मारली. दिल्लीतील ७ पैकी सर्वच्या सर्व ७ जागा भाजपने जिंकल्या. मतांच्या टक्केवारीत भाजप पहिल्या, काँग्रेस दुसऱ्या तर आप तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली.

Leave a Comment