राज्यातील सत्तानाट्य संपले; देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी । आजचा दिवस हा राज्याच्या राजकारणातील सर्वाधिक वेगवान घडामोडी घडणारा ठरला आहे. अजित पवार यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला आहे. अजितदादा यांच्या राजीनाम्यानंतर आमच्याकडे बहुमत नसल्याने आम्ही सत्तेमध्ये राहु शकत नाही, असे कारण पुढे करत फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये राजीनाम्याची घोषणा केली.

पत्रकार परिषदेमध्ये फडणवीस म्हणालेत, “काही करणास्तव आघाडी होऊ शकत नाही असं अजित पवारांनी सांगून राजीनामा दिला. आमच्याकडे आता बहुमत नाही. जे आता सत्ता स्थापन करणार त्यांना शुभेच्छा आहेत, मात्र हे सरकार आपल्याच ओझ्याखाली दबेल.”

“कधीही शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देऊ असं ठरलं नव्हतच. न ठरलेल्या बाबींचा शिवसेनेने बाऊ केला. आमच्याकडे बहुमत नाही. आम्ही घोडेबाजार करणार नाही. आम्ही कोणत्याही पक्षाचे आमदार फोडणार नाही अशी भूमिका आमची पूर्वीपासून होती. बहुमत नसल्याने मी राज्यपालांकडे राजिनामा देत आहे.” असे या पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

आमची मानसिकता कधीही चूक नव्हती, पाच वर्ष आम्ही अहोरात्र काम केले, जनतेने आम्हाला भरपूर प्रेम दिलं, आम्ही अनेक प्रगतीचे टप्पे पार केलेत यात जनतेचा व अधिकारी वर्गाचा वाटा आहे तसेच पाच वर्ष सोबत असलेल्या शिवसेनेचेही सहभाग होता. या सर्वांचे आभार यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मानले.

Leave a Comment