मरण्यापूर्वी खुलून जगायला शिकवणारा – दिल बेचारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बॉलिवूड नगरी |आपल्या हरहुन्नरी अभिनयाने छोट्या पडद्यावरुन मोठ्या पडद्यावर आलेल्या आणि अल्पावधीतच भारतीय प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या सुशांत सिंग राजपूतचा शेवटचा चित्रपट ‘दिल बेचारा’ आज प्रदर्शित झाला. साधारण दीड महिन्यांपूर्वी रहस्यमय पद्धतीने दुनियेतून एक्झिट घेणाऱ्या सुशांत सिंग राजपूतची आठवण या चित्रपटाच्या प्रत्येक प्रसंगातून येत राहिली. चित्रपटात सुशांत ज्या पद्धतीने गेला त्याच पद्धतीचा आकस्मिक धक्का खऱ्या सुशांतने दिला एवढं मात्र नक्की..!!

इमॅन्युअल राजकुमार ज्युनिअर (सुशांत सिंग राजपूत) आणि किझी (संजना संघी) यांच्या आजारपणातील जगण्याची वाटचाल आणि एकमेकांच्या स्वप्नांप्रति असलेल्या प्रेमाचा लघुपट म्हणजे दिल बेचारा. किझी ही थायरॉईड कॅन्सरने तर इमॅन्युअल हासुद्धा दुर्धर कॅन्सरने पाय गमावलेल्या स्थितीत आपल्यासमोर येतात. आपल्या आजारपणाचा कोणताही बाऊ न करता दोघांनीही एकमेकांच्या जगण्याच्या आनंदाचा शोध घ्यायला सुरुवात केलेली असते. अभिमन्यू वीर (सैफ अली खान) या संगीतकाराच्या अधुऱ्या कवितेच्या शोधातील किझीला अभिमन्यूपर्यंत पोहचवण्याची धडपड इमॅन्युअल करत असतो.

ही धडपड शेवटी पूर्ण होते का? स्वप्नांचा पाठलाग करण्यात आयुष्यात जर एखादा मूर्ख वाटणारा निर्णय घ्यायची वेळ आली तर तो घ्यावा का? जिवलग व्यक्तीच्या मरणानंतर सुखाने जगता येऊ शकतं का? या सगळ्यांची फिल्मी स्टाईल पण वास्तव आयुष्याला रिलेट करणारी उत्तरं तुम्हाला मिळवायची असतील तर दिल बेचारा तुम्ही पहायलाच हवा. डिस्ने प्लस हॉटस्टारने सुशांतच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हा चित्रपट सर्वांना मोफत पाहण्यासाठी उपलब्ध करुन दिला आहे. प्रत्यक्ष आयुष्यातील असुदेत किंवा रुपेरी पडद्यावरील भावनिक भूमिका साकारणं हे काम जिकिरीचं असतं आणि सुशांतने ते व्यवस्थित पेललं. संजनाची भूमिकाही उल्लेखनीय अशीच आहे. किझीच्या आई-वडिलांचा आणि इमॅन्युअलच्या मित्राचा हलका फुलका अभिनयही भारी आहे. चित्रपट संपल्यानंतर खंत राहते ती फक्त एकच – रुपेरी पडद्यावरील भूमिका सुशांत वास्तव आयुष्यात का जगला नाही..???

Leave a Comment