मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव यांच्यासमोर असणार ‘हे’ मोठं आव्हान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी । महिनाभरापासून सुरु असलेल्या राजकीय सत्ता नाट्यावर अखेर पडदा पडला. बहुमत सिद्ध करू न शकल्याकारणाने भाजपा सरकार कोसळले आणि महाविकासआघाडीला सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला. याच पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. मात्र मुख्यमंत्री पदाचा कारभार स्वीकारल्यानंतर सर्वात मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे ते शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे.

निवडणुकांच्या प्रचारापासून काँग्रेस , राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीनही पक्षांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली होती. मात्र विधानसभा निकालानंतर तीनही पक्षांचे एकत्रितपणे सरकार स्थापन होत आहे. महाविकास आघाडीच्या या महत्त्वाकांक्षी सरसकट शेतकरी कर्जमाफीसाठी सुमारे ६० हजार कोटी रुपयांहून अधिक निधी लागणार असल्याची माहिती समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारलाही देवेंद्र फडणवीस सरकार प्रमाणेच हा निधी कर्जरूपानेच उभारावा लागणार असल्याने सुमारे पावणेपाच लाख कोटी रुपये कर्जाचा बोजा मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी उभारणीचे मोठे आव्हान नवीन सरकारपुढे आहे.

गेल्या तीन वर्षांमध्ये दुष्काळ, अतिवृष्टी आणि कर्जमाफीच्या आशेमुळे थकबाकी वाढत गेली आहे. कर्जमाफीचा निर्णय झाल्यावर बँकांकडून तपशीलवारआकडेवारी मागवावी लागेल, पण ढोबळमानाने ही थकबाकी सुमारे ६० हजार कोटी रुपयांवर जाण्याची शक्यता सहकार व अर्थखात्याच्या उच्चपदस्थांनी व्यक्त केली.

Leave a Comment