माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचं निधन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झालं आहे. दिल्लीत उपचारादरम्यान त्यांचे निधन झालं आहे. दिल्लीतील रिसर्च अँड रेफरल रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपाचार सुरु होते. मेंदूत गाठ असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. मुलगा अभिजीत यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. अभिजीत मुखर्जी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “जड अंतकरणाने  मी आपणास सांगू इच्छितो की डॉक्टरांनी केलेले अथक प्रयत्न, देशभरातून करण्यात आलेल्या प्रार्थना यानंतरही माझे वडील प्रणव मुखर्जी यांचं निधन झालं आहे.”

प्रणब मुखर्जी यांनी पश्चिम बंगालमधून आपल्या राजकारणाला सुरुवात केली. काँग्रेस पक्षाचे निष्ठावान आणि महत्वाचे नेते म्हणून त्यांची ओळख होती. काँग्रेसच्या मोजक्याच विद्वान आणि चाणाक्ष लोकांमध्ये प्रणब मुखर्जी यांचं नाव आजही घेतलं जातं. लोकसभेत त्यांनी काँग्रेसचं दीर्घकाळ प्रतिनिधित्व केलं. भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मानही त्यांना मिळाला होता. याशिवाय पद्मविभूषण पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. संयुक्त पुरोगामी सरकारच्या काळातील केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांनी अर्थमंत्री, विदेश मंत्री, संरक्षण मंत्री अशी विविध पदे यशस्वीपणे सांभाळली. २०१२ साली राष्ट्रपती पदावर त्यांची नियुक्ती झाली. २०१७ पर्यंत राष्ट्रपतीपदाचा यशस्वी कार्यकाळ त्यांनी पूर्ण केला. २०१७ सालीच ‘कोएलीएशन इयर्स’ नावाचं त्यांचं पुस्तकही प्रकाशित झालं. २००४ आणि २००९ साली पंतप्रधानपदासाठी त्यांचंही नाव चर्चेत होतं, मात्र दोन्ही वेळेला काँग्रेस पक्ष श्रेष्ठींनी मनमोहन सिंग यांच्याच नावाला पसंती दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रणब मुखर्जींच्या राजकारणातील निवृत्तीवेळी ते आम्हाला वडीलांसारखे असल्याचं म्हटलं होतं. राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर प्रणब मुखर्जींनी RSS चं मुख्यालय असणाऱ्या नागपूरला दिलेली भेटही चांगलीच चर्चेत राहिली होती.

वन इंडिया परिवारातर्फे भारतरत्न प्रणब मुखर्जी यांना भावपूर्ण श्रद्धांजली..!!

Leave a Comment