राज्य उत्‍पादन शुल्क विभाग व भरारी पथकाच्या छाप्यात 11 लाख 61 हजारांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
वाठार येथील पुणे-बेंगलोर नॅशलन हायवेवर राज्य उत्‍पादन शुल्क विभाग व भरारी पथकाने छापा टाकून 11 लाख 61 हजार 400 रूपये इतक्या किंमतीचा गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त केला आहे. जिल्हा अधीक्षक गणेश पाटील, राज्य उत्पादन निरीक्षक, जिल्हा भरारी पथक यांच्या स्टाफसह पुणे-बेंगलोर नॅशनल हायवेर दि. 17 फेब्रुवारी रोजी रात्री गस्त घालून संशयित वाहनांची तपासणी करत असताना वाठार ता. हातकणंगले गावच्या हद्दीत पुणे-बेंगलोर नॅशनल हायवेवर हॉटेल सुशांतच्या समोर असणाऱ्या सेवा रस्त्यावर एक आयशर कंपनीचा मालवाहतुक ट्रक MH-07-AJ-0145 संशयीतरित्या थांबल्याचे निदर्शनास आले. पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चालकास वाहनामध्ये काय माल आहे याबाबत विचारणा केली असता वाहनात त्रिफळा वनस्पतीच्या वाळलेल्या लहान कांड्यांनी भरलेल्या गोण्या असल्याचे सांगितले.

पथकातील कर्मचाऱ्यांनी वाहनात प्रवेश करुन पाहणी केली असता प्रथमदर्शनी चालकाने सांगितल्या प्रमाणे गोण्या दिसून आल्या परंतु कर्मचऱ्यांच्या संशय बळावल्याने त्यांनी अधिक शोध तपास केला असता गोण्यांच्या खाली लपवलेले बॉक्स दिसून आले. त्यामध्ये विविध ब्रँडचे गोवा बनावटीचे अवैद्यरित्या आणलेले विदेशी मद्य असल्याचे आढळून आले. या वाहनामधून प्रदीप विश्वनाथ निगरे, (वय 58, रा. घर नं.-17, खारेपाटण, ता. कणकवली, ता. सिंधुदुर्ग) व महेश तुकाराम कारंडे (वय 42, रा. कोष्टीवाडी, खारेपाटण, ता. कणकवली, ता. सिंधुदुर्ग) या दोघांना ताब्यात घेतले आहे.

या छाप्यात गोवा बनावटीच्या विदेशी मद्यांचे रॉयल स्टॅग, गोल्डन एस.ब्ल्यु व्हिस्की, मॅकडॉल न. 01 या ब्रँडच्या 750 मिलीचे 67 बॉक्स इतके मद्य मिळाले असून त्याची बाजारभावानुसार एकूण 5 लाख 6 हजार 400 इतकी किंमत आहे. गुन्ह्यात वापरलेले वाहन व इतर मुद्देमाल, मोबाईल संच यांची एकूण जप्त मुद्देमालाची किंमत 11 लाख 61 हजार 400 इतकी आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे गणेश पाटील, भरारी पथकाचे निरीक्षक संभाजी बरगे, दुय्यम निरीक्षक जगन्नाथ पाटील, किशोर नडे, जवान सर्वश्री संदीप जानकर, सागर शिंदे, सचिन काळेल, जय शिनगारे, रंजना पिसे यांनी ही कारवाई केली.

Leave a Comment