मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा पत्ता – मातोश्री की वर्षा ??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी |  महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे काही वेळातच शपथ घेतील. तब्बल २० वर्षानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री पाहण्याचं भाग्य महाराष्ट्रातील जनतेला लाभलं आहे. १९९६ साली युतीचं सरकार आल्यानंतर सत्तेचा रिमोट कंट्रोल आपल्याकडे ठेवत बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी आणि नारायण राणेंच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ टाकली. ठाकरे घराण्यातील कुणी सक्रिय राजकारणात सहभागी होईल अशी शक्यता वाटत नसताना २०१९ साली आदित्य ठाकरे यांनी वरळीतून विधानसभेची निवडणूक लढवली आणि ठाकरे घराण्यातील ते पहिले आमदार बनले.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाने २०१९ साली नाट्यमय वळणं घेतल्यानंतर संजय राऊत यांनी भाजपचं दडपण झुगारून शिवसेनेला आपला स्वाभिमान परत मिळवून दिला. मुख्यमंत्रीपदाची मागणी कायम ठेवत शिवसेनेने भाजपला सत्तेपासून रोखलं. कोणत्याही परिस्थितीत तडजोड करायचीच नाही हे शिवसेना आणि भाजपने ठरवलं आणि याचाच फायदा शरद पवारांनी घेऊन राज्यात महाविकासआघाडीची मोट बांधली. तब्बल एक महिना मुख्यमंत्री कोण? या प्रश्नाभोवती रंगलेलं हे सत्तानाट्य ‘आम्ही १६२’ या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सर्व आमदारांनी एकत्र मिळून आल्यानंतर केलेल्या घोषणेनंतर संपलं. महाविकासआघाडीचा नेता म्हणून उद्धव ठाकरे यांचं नाव शरद पवारांनी पुढं केलं आणि राज्याला ठाकरे घराण्यातील पहिला मुख्यमंत्री मिळाला.

आता मात्र हे मुख्यमंत्री महोदय नक्की कुठं राहणार असा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेसोबत मुख्यमंत्र्यांनाही पडला असेल. शिवसेनेचं केंद्रस्थान म्हणून मातोश्री हे आतापर्यंत सगळ्यांना परिचीत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या सर्व स्मृतीही याच ठिकाणी आहेत. आदित्य ठाकरेही अद्याप अविवाहित असल्यामुळे त्यांना एकट्याला मातोश्रीवर थांबवून स्वतः उद्धव ठाकरे पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासोबत शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’वर राहायला जाणार का? हे पाहणं रंजक ठरणार आहे.

Leave a Comment