मोहोळमध्ये रस्ता दुरुस्तीच्या कारणास्तव ४ गावांचा मतदानावर बहिष्कार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी | मोहोळ विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या पंढरपूर तालुक्यातील तारापूर, वीटे, पोहरगाव, खरसोळी या चार गावांना आजही पक्का डांबरी रस्ता नाही. त्यामुळं या चार गावातील ग्रामस्थांनी विधानसभा निवडणूकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला आहे. चार गावातील सरपंचानी एकत्र येत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. चारही गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. खराब रस्त्यामुळे येथील ग्रामस्थांना अडचणींना सामोर जाव लागत आहे. या रस्त्यावरील अपघातांच प्रमाणही मागील काही दिवसांत वाढलेलं आहे.

पंढरपूरकडे येण्यासाठी सदरच्या चार गावांना एकच रस्ता आहे. गावातील १५०० विद्यार्थ्यांना माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी सुस्ते व पंढरपूरला जाव लागतं. मात्र हा रस्ता खराब असल्याने एसटी वेळेत येत नाही. तसेच घरी परत येण्यास वेळ होत असल्याने या भागातील तरुणांना उच्च शिक्षणापासून वंचित रहाव लागतं. आरोग्यव्यवस्थेची सुद्धा अशीच बोंब असल्याने या परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. गेल्या वीस वर्षांपासून या चार गावातील नागरिकांना रस्त्यावरून खडतर प्रवास करावा लागतो आहे. रस्ता नूतनीकरणासाठी अनेकवेळा ग्रामपंचायतीने ठराव देऊनसुद्धा संबंधित विभागाकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही. यापूर्वी अनेक नेतेमंडळींकडे रस्त्याची मागणी केली असता, नेत्यांनी ठोस निर्णय घेतला नसल्यानं रस्त्याचं नूतनीकरण झालं नाही. त्यामुळे जोपर्यंत रस्त्याचं काम सुरू होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, शिवाय मतदानावरही बहिष्कार टाकण्यात येईल असं ग्रामस्थांनी सांगितलं आहे.

Leave a Comment