‘पवार फॅक्टर’मुळे ‘सेना’ चिंताग्रस्त; शिवसेनेची ५७ जागांवर राष्ट्रवादीशी लढत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षांकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकहाती प्रचाराचा धडका लावल्यामुळे महायुती सत्तेवर येण्याची खात्री असूनही शिवसेना चिंतित आहे. शिवसेनेचे १२४ पैकी सर्वाधिक ५७ उमेदवार हे राष्ट्रवादीच्या उमेदवारांशी लढत देत असल्याने त्याचा फटका आपल्या संख्याबळाला तर बसणार नाही ना अशी चिंता शिवसेनेला सतावत आहे.विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना या सत्ताधारी युतीला धारेवर धरण्यात विरोधक कमी पडले असे चित्र दिसले. काँग्रेस हा मोठा पक्ष असूनही महाराष्ट्रव्यापी प्रचारात काँग्रेस अपयशी ठरली. पक्षाचे सर्व नेते आपापल्या भागातच अडकल्याचे दिसून आले. विरोधकांची उणीव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भरून काढली. त्यांनी प्रचाराचा धडाका लावत सरकारच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले. पवारांच्या या प्रचार धडाक्यामुळे राष्ट्रवादीला त्याचा राजकीय लाभ होणार अशी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान कोल्हापुरातील कागल मतदारसंघात राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांच्याविरोधात शिवसेनेचे संजय घाटगे रिंगणात आहेत. त्यात भाजपचे समरजितसिंह घाटगे यांनी बंडखोरी केली आहे.

करमाळ्यात शिवसेनेने विद्यमान आमदार नारायण पाटील यांना डावलत रश्मी बागल यांना उमेदवारी दिली. राष्ट्रवादीने अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे यांच्या पाठीशी ताकद लावली आहे. शिवाय नारायण पाटील यांनी बंडखोरी केल्याने शिवसेनेला फटका बसण्याची चिन्हे आहेत. साताऱ्यात पाटणमध्ये शिवसेनेचे विद्यमान आमदार शंभुराजे देसाई यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे सत्यजित पाटणकर यांच्यात लढत होत आहे. मुंबईतील अणुशक्तीनगरमध्ये नवाब मलिक आणि शिवसेनेचे तुकाराम काते यांच्यात चुरशीची लढत होत आहे. ठाण्यात शहापूरमध्ये सेनेचे पांडुरंग बरोरा व राष्ट्रवादीचे दौलत दरोडा यांच्यात लढत होत आहे. सांगोलामध्ये शिवसेनेचे उमेदवार शहाजीबापू पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादीने आपली ताकद शेकापच्या पाठीशी उभी केली आहे.

Leave a Comment