दिवसा माझ्याशी चर्चा केलेल्या नेत्याच्या घरी रात्री इन्कमटॅक्सची माणसं पोहचतातच कशी? – शरद पवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतिनिधी । राज्याच्या राजकारणाची दिशा भलतीकडे निघाली आहे. सत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाणारे हे लोक असून, मिळालेल्या सत्तेचा वापर करून विरोधकांना दडपण्याचा प्रयत्न सध्याचं सरकार करत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केला. दिवसा माझ्याशी चर्चा केलेल्या नेत्याच्या घरी रात्री इन्कमटॅक्स ऑफिसची माणसं जाऊन पोहचतात, हे कसं काय? हा फोन टॅपिंगचा प्रकार निवडणुकीच्या दोन महिने आधीच बोकाळला असून कारवाई केली जाण्याची एकप्रकारची दहशतच विरोधकांमध्ये या सरकारने निर्माण केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री हे प्रांतवादी असल्याचा टोलाही शरद पवारांनी लगावला. सरकार स्थापन व्हायच्या आधीपासूनच विदर्भवादी म्हणून फडणवीस ओळखले जात होते. आताही विदर्भाच्या दृष्टीने पूरक निर्णय घेऊन उर्वरित महाराष्ट्रवर घोषणांचा पाऊस पाडण्यातच मुख्यमंत्र्यांनी धन्यता मानल्याचं पवार म्हणाले.

माध्यमांच्या प्रतिनिधींना दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी विविध प्रश्नांवर उत्तरे दिली. माझ्या पक्षातील नेते बाहेर जात असताना काहींनी मला अडचणी सांगितल्या तर काहींना ते सांगणं गरजेचं वाटलं नाही. विरोधात राहून आपला विकास होणार नाही असं वाटूनच काहींनी पक्षांतर केलं. अडचणीच्या आणि संघर्षाच्या काळात ते लढायला कमी पडले एवढंच मी म्हणतो असंही स्पष्टीकरण पुढे पवारांनी दिलं. ईडीची चौकशी हा सरकारच्या दबावतंत्राचा एक भाग होता. आपण कोणत्याही बँकेच्या संचालकपदावर नव्हतो त्यामुळे आपल्याला घाबरण्याचं काहीच कारण नव्हतं असंही पवार म्हणाले. विधानसभा निवडणुकांसाठी राजला सोबत घ्यायचं होत. सध्या महाराष्ट्राला कशाची आवश्यकता आहे हे राज ठाकरेंना चांगलं माहिती असून त्याचा आघाडीला फायदाच झाला असता परंतु इतर पक्षांच्या उदासीनतेमुळे ते शक्य झालं नसल्याचं पवारांनी सांगितलं.

आरेमधील झाडं तोडली जाणं हे वेदनादायी असून सरकारने लोकांच्या भावनांचा आदर यावेळी तरी करणं गरजेचं असल्याचं पवार म्हणाले. दरवर्षी मोठमोठ्या घोषणा करून लावलेली किती झाडं जगली हे सरकारने पाहिलं पाहिजे असा टोलाही पवारांनी पुढे लगावला. चंद्रकांत पाटील यांनी पवारांना घरभेदी अशी उपमा दिली होती, शिवाय पवारांनी जे पेरलं तेच उगवलं असा उपरोधिक टोलाही लगावला होता. त्यावर उत्तर देताना पवारांनी मीच गोपीनाथ मुंडेंना भाजप सोडू नका असं सांगितलं होतं असं स्पष्टीकरण दिलं. ज्यांना स्वतःच्या जागेतून निवडून येता येत नाही ते सगळ्यात सुरक्षित मतदारसंघ निवडून इतरांना पक्षबांधणीचा सल्ला देतात, यापेक्षा हास्यास्पद काय? असा टोलाही पवारांनी चंद्रकांतदादा पाटील यांना लगावला.

पत्रकारांवर चिडण्याच्या प्रसंगाबाबत पवारांना विचारलं असता, तो पत्रकार कोणत्या पक्षाची तळी उचलतो हे माहित असल्यामुळे त्याच्यावर मुद्दाम का होईना रागावणं गरजेचं असल्याचं पवारांनी सांगितलं.

Leave a Comment