सतेज पाटलांना हरवलंय; पुतण्याला हरवणं कठीण नाही – प्रमोद सावंत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर

कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील २०१४ च्या निवडणुकीत आमदार अमल महाडिक यांनी माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना पराभवाची धूळ चारली आहे. आता त्यांचा पुतण्या ऋतुराज पाटील विरोधात उभा आहे. काका पडू शकतो त्यामुळे पुतण्याला हरविणे कठिण नाही, असा टोला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी लगावला. कोल्हापूरमधील अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ ते बोलत होते. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना– भाजपा आणि मित्रपक्ष महायुतीच्या सरकारने गेल्या पाच वर्षात अनेक योजना राबविल्या आहेत. त्यामुळे नवमहाराष्ट्र घडविण्यासाठी महाराष्ट्रातील जनता पुन्हा महायुतीलाच साथ देईल.

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व जागांवर महायुतीचेच उमेदवार निवडून येतील असा विश्वास गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. गेल्या पाच वर्षात फडणवीस सरकारने केलेल्या कामांमुळे महाराष्ट्रात महायुतीला पुन्हा सत्ता मिळणार आहे. अखंड भारताचे भाजपाचे स्वप्न होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी कलम 370 रद्द करून अखंड भारताचे स्वप्न साकार करण्याकडे वाटचाल सुरु ठेवली आहे. काश्मीर भारतात येत असताना, विरोधकांना वाईट का वाटावे, संसदेत विरोधकांनी विरोध का केला? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. यावेळी राफेल विमानाच्या पूजनासंदर्भात बोलताना सावंत म्हणाले, दसर्‍यादिवशी शस्त्र पूजन केले जाते, त्याप्रमाणे राफेलचे पूजन केले त्यात वावगे काय? अशी विचारणा करून या घटनेचे समर्थनच करत असल्याचे सांगितले.

सावंत यांनी कोल्हापुरातील स्थानिक आमदार अमल महाडिक यांच्या कामाचे कौतुक केले. कोल्हापूर विमानतळाच्या विकासासाठी भरघोस निधी आणला, यामुळे कोल्हापूरची इतर शहराशी हवाई कनेक्टिव्हिटी वाढली आहे. सिपीआरसाठी मोठ्या प्रमाणात निधी आणल्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. काँग्रेस–राष्ट्रवादी आघाडीने पंधरा वर्षात काहीच केले नाही. मात्र युती सरकारने गेल्या पाच वर्षात काय केले हे लोकांसमोर आहे. याचाच फायदा महायुतीच्या उमेदवारांना निवडणुकीत होईल असं सावंत पुढे बोलताना म्हणाले.

Leave a Comment