Breaking | राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांकडून अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | काँग्रेस नेते राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी जात असताना पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली असल्याचं समजत आहे. कलम १८८ अंतर्गत पोलिसांकडून अटकेची कारवाई करण्यात आली आहे. काँग्रेसकडून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी योगी आदित्यनाथ यांना कशाची भीती वाटत आहे अशी विचारणा प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे. राहुल गांधी यांनी स्वत: ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे.

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हाथरसमधील बलात्कार पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी जात असताना पोलिसांनी रोखल्यानंतर राहुल गांधी चालत निघाले होते. त्यावेळी उत्तर प्रदेश पोलिसांकडून काँग्रेस नेते राहुल गांधी यांना धक्काबुक्की करण्यात आली. पोलिसांनी त्यांना अडवलं. पोलिसांनी लाठीचार्ज करुन आपल्याला खाली पाडलं असं राहुल गांधींनी सांगितलं.

राहुल गांधी यांनी “पोलिसांकडून मला धक्काबुक्की करण्यात आली. लाठीचार्ज करुन मला खाली पाडलं. फक्त मोदीच या देशात चालू शकतात का ? सर्वसामान्य व्यक्तीला ही परवानगी नाही का ? आमचं वाहन थांबवण्यात आलं म्हणूनच चालत निघालो होतो”. अशा आशयाचे ट्विट केले आहे.

गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातूनही योगी आदित्यनाथ सरकारवर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी आणि प्रियंका गांधींच्या स्वागतासाठी दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. पोलिसांनी रोखल्यानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी कार्यकर्त्यांसोबत पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान हाथरस जिल्ह्यात १४४ कलम लागू करण्यात आलं आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत हे आदेश लागू आहेत. तर सर्व सीमा सील करण्यात आल्या आहेत.

Leave a Comment