वाचनानं आम्हाला काय दिलं? – भाग ३

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भारताचे माजी राष्ट्रपती, महान संशोधक, भारतरत्न ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या ८८ व्या जन्मदिवसानिमित्त ग्रामीण भागातील तरुण तरुणींना ‘वाचन’ याविषयी लिहितं केलं. आपल्या आयुष्यात वाचनाचं महत्व काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न तरुणाईने केला. हॅलो महाराष्ट्रच्या वाचकांपर्यंत त्यांची ही धडपड पोहचवत आहोत.

ज्ञानात भर टाकण्यासाठी – वाचन करायलाच पाहिजे – अंकिता डांगे

वाचन, लहानपणी प्रश्न पडायचा का बरे सांगत असतील थोरे-मोठे की वाचन करा? वाचन केल्याने तुमचा विकास होईल. यातून ही एक म्हण नेहमी तोंडी असे – ‘वाचाल तर वाचाल’. लहानपणी जे समजलं नाही ते आता नक्कीच ध्यानी येते. कारण वाचनाचे महत्त्वच एवढे मोठे आहे की त्यास तोडच नाही. तुम्ही एकदा वाचन करून तर पाहा, एखादे पुस्तक, एखादा ग्रंथ वाचून तर पाहा. तेव्हा तुम्हाला जाणवेल की वाचन संस्कृती किती अप्रतिम आहे. ‘ग्रंथ हेच गुरू ‘ ही तर भारताची धारणाच आहे. ग्रंथासारखा गुरू जगभरात शोधूनही सापडणार नाही याची मला खात्री आहे. गुरू नसताना जर कोणी आपल्याला ज्ञान संपादन करत असेल तर ती एकमेव गोष्ट म्हणजे ग्रंथ होय. ग्रंथाच्या वाचनाने माणसाच्या मनातील अमर्याद शक्ती जागी होते. वाचनाने माणसाला हवे असणारे सर्व ज्ञान प्राप्त होते. वाचनाने माणूस आपल्या विचार शक्तीवर भर देतो, स्वतःतील गुण जोपसतो. वाचनाने माणूस नवनवीन स्वप्ने पाहू लागतो. आपल्या स्वप्नांच्या मागे धावू लागतो. कोण जाणे कधी कोणतं पुस्तक वाचल्याने कोणाला कोणत्या नव्या स्वप्नाची चाहूल लागेल, कोणतं नवीन ध्येय मिळेल.

ग्रंथ हे नेहमीच आपले प्रेरणा स्थान असतात. ग्रंथ किंवा एखादे पुस्तक जरी आपण वाचले तरी ते आपल्या सर्वांगिण विकासासाठी खूप उपयुक्त ठरतात. ग्रंथाच्या वाचनाने आपले लेखन कौशल्य वाढते, आपला आत्मविश्वास वाढतो, आपल्या ज्ञानात अधिक भर पडते. आपल्याला आदर्श जीवन जगण्याची कला ही ग्रंथाच्या वाचनाने उपजते.शेवटी मंगेश पाडगावकरांच्या कवितेतील दोन ओळी सांगाव्या वाटतात.

‘ग्रंथ आमुचे साथी , ग्रंथ आमुच्या हाती
ग्रंथ उजळती अज्ञानाच्या, अंधाराच्या राती ‘.

WhatsApp Image 2019-10-14 at 16.51.21
अंकिता डांगे, प्रथम वर्ष, कला छ. शिवाजी कॉलेज , सातारा

कित्येक मालिका आणि चित्रपटांचा आधार – पुस्तकांचं वाचनच – सोनल सुनिल जाधव

वाचनाचे महत्व आपण आपल्या शालेय जीवनापासून ऐकत आलोय, पण सध्या आसपास अनेक मनोरंजनाची साधने उपलब्ध आहेत. दुरदर्शन, संगणक व त्यावर खळले जाणारे खेळ हे आपल्याला मानसिक आनंद देतात पण वाचनाने नवनवीन माहिती मिळते. आज कित्येक अशा कादंबरीवर आधारीत चित्रपट व मालिका तयार झालेल्या आहेत. मी वाचलेली सुंदर कादंबरी जी आज colors Marathi वाहिनीवर चालू आहे. स्वामिनी म्हणून.. स्वामी या कादंबरीमध्ये पेशवेकालीन राजकीय जीवन, कर्तृत्व, वैयक्तिक जीवन यांचे प्रभावी चित्रण आहे.प्रेम कसे करावे सांगणारी ही कादंबरी…. मानसिक समाधान आणि विलक्षण आनंद वाचनातून मिळत असतो, जिद्दीने काम करण्याची नवीन प्रेरणा येते.वाचनाची गोडी निर्माण होते. कारण वाचाल तर वाचाल..

WhatsApp Image 2019-10-14 at 18.37.29
सोनल सुनिल जाधव बी. एस्सी. भाग १, फॉरेन्सिक सायन्स, वाय.सी कॉलेज, सातारा.

देव्हाऱ्यातल्या देवाइतकीच मला पुस्तकं प्रिय – प्रशांत यादव

डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिका ,संघटित व्हा आणि संघर्ष करा. यात जीवनामध्ये संघर्ष करताना पहिली पायरी ही शिकण्याची आहे, वाचण्याची आहे हे लक्षात असलं पाहिजे. खरं तर मी आत्ता माझ्या शिक्षणाच्या काळात आणि स्पर्धेच्या युगात स्वतःच अस्तित्व निर्माण करताना वाचन हेच मला सर्वात जवळचा गुरु आणि मित्र पण वाटत आल आहे. माझ्या लहानपणी बिरबलाच्या गोष्टींपासून सुरु झालेलं वाचन आत्ता वैचारिक पुस्तके वाचाण्यापर्यंत खूप बौध्दीक आनंद देणारं ठरलं. “दिसामाजी काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंड वाचीत जावे” हे समर्थांच वचन मी समर्थपणे पाळत आलो आहे.

माझ्या वाचनाच्या आवडीने मला कॉलेज च्या जीवनात व्यासपीठावर उभ केलं आणि त्याच्या माध्यमातून बऱ्याच वक्तृत्व, काव्य वाचन स्पर्धेत यश सुध्दा मिळवून दिलं. २०१८-१९ चा महाविद्यालयाचा सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार सुध्दा याच वाचनाने मला दिला. मला वाटतं वाचनाने माणसाला फक्त शब्दांची ओळख होत नाही तर माणूस प्रगल्भ आणि प्रतिभासंपन्न होतो. आणि हीच प्रतिभा निरनिराळ्या कलांमधून व्यक्त होत असते. मी माझ्या घरात छोटंसं माझ ग्रंथालय बनवलं आहे.

दररोज जस देव्हाऱ्यात देवा समोर मी नतमस्तक होऊन प्रार्थना करतो तस दररोज मी किमान एक तास तरी वाचन करून मी ज्ञानाची उपासना करतो. माझं वाचन ही माझी आवड नसून आता माझा स्वभाव झाला आहे. वाचनाने माणसाचं फक्त मस्तक सुधारत नाही तर संपूर्ण व्यक्तिमत्व सुधारतं. खरं तर मी पुस्तकात शब्दांच्या तरंगा बरोबर जगण्याचं अंतरंगच वाचत असतो. आणि हे जगण्याचं अंतरंग माझ्या आयुष्या बरोबर समांतर चालत असतं. शेवटी वाचन आपल्याला हेच सांगत असत की

“कळणार ना तसा मी वाचून ये मला तू
कळतो जरा कुठे मी भरपूर चाळल्यावर…”

WhatsApp Image 2019-10-14 at 18.36.47
प्रशांत यादव, वायसी कॉलेज, सातारा

Leave a Comment