‘आरपीआय’चे अध्यक्ष रामदास आठवले यांनाही कोरोनाची लागण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि  रिपब्लिकन पार्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या आठवले यांची प्रकृती उत्तम आहे. पण खबरदारीचा उपाय म्हणून ४ दिवस मुंबईतील खासगी रुग्णालयात दाखल होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तसंच आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनी काळजी घेण्याचं आवाहन आठवले यांनी केलं आहे.

यासंदर्भात आठवले यांनी ट्विट केले आहे, माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. खबरदारी चा उपाय म्हणून रुग्णालयात दाखल होण्याचा वैद्यकीय सल्ला पाळणार आहे. या दरम्यान माझ्या संपर्कात आलेल्यांनी खबरदारी म्हणून आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. प्रकृती चांगली आहे. काळजी नसावी. सध्याचे नियोजित कार्यक्रम रद्द केले आहेत. अस रामदास आठवले म्हणाले.

रामदास आठवलेंना सौम्य लक्षणं असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या कार्यक्रमात जे उपस्थित होते, त्यांनी देखील सतर्क राहण्याचं आवाहन रिपाइंकडून करण्यात आलं आहे. गेल्या चार दिवसात राज्यातील अजून तीन मोठ्या नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सध्या सेंट जॉर्ज या सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांना रेमडीसिव्हिरचा डोस देण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे. तसंच फडणवीस यांच्यावर पहिली प्लाझ्मा थेरेपी करण्यात आली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अजितदादांचीही प्रकृती चांगली असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment