शरद पवारांच्या ‘त्या’ सभेनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये जोश! ट्विटर द्वारे व्यक्त केले मत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतिनिधी । राज्यभरामध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपण्यासाठी केवळ काही तास शिल्लक आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडवला असून सर्वच पक्ष मतदारराजापर्यंत पोहचण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करताना दिसत आहे. अनेक पक्षांच्या सभा वेगवेगळ्या कारणाने गाजत आहेत. अशीच एक सभा सध्या शुक्रवार रात्रीपासून तुफान चर्चेत आहे ती म्हणजे साताऱ्यामध्ये झालेली राष्ट्रवादी काँग्रेसची सभा.

पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सभा सुरु असताना मुसळधार पाऊस कोसळू लागला पण पवार थांबले नाही आणि त्यांनी आपले भाषण सुरुच ठेवले. पवारांचा भर पावसात भाषण देतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाले आहेत. शनिवारी सकाळपासूनच #SharadPawar हा हॅशटॅग ट्विटवर पहिल्या क्रमांकावर ट्रेण्ड होताना दिसला. त्यातच आता शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या सभेबद्दल आपले मत व्यक्त केले आहे.

सुप्रिया यांनी ट्विट करुन या सभेतील पवारांचा फोटो शेअर करत आपले मत व्यक्त केलं आहे. या सभेमुळे सर्वांनाच नवी उर्जा मिळाली आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. “साताऱ्याच्या मातीनं आज पुन्हा इतिहास घडविला. तुफान पावसातही माणसांनी तुडूंब भरलेलं मैदान आदरणीय शरद पवार साहेबांना ऐकत होतं. ‘वारं फिरलंय, इतिहास घडणार’, हा संदेश देणाऱ्या या सभेनं राष्ट्रवादीच्या सर्वांनाच नवी उर्जा मिळाली,” असं ट्विट सुप्रिया यांनी केले आहे. दरम्यान सुप्रिया सुळे यांच्यासोबत धनंजय मुंडे , वंदना चव्हाण, डॉ. राजेंद्र शिंदे यांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून शरद पवार यांच्या सभेबद्दल मत व्यक्त केले आहे. दरम्यान, पवारांनी या सभेत त्यांनी ‘लोकसभेला उद्यनराजेंना तिकीट देऊन मी चूक केली हे मान्य करतो. मात्र प्रत्येक सातारकर आता झालेली चूक सुधारण्यासाठी २१ तारखेची वाट पाहत आहे,’ असं मत व्यक्त केलं.

 

Leave a Comment