शरद पवारांच्या पंतप्रधानपदाच्या तयारीची ‘हीच ती वेळ’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | गुरुवारी संध्याकाळी शिवतीर्थावर उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत असताना महाराष्ट्रातील या सत्ताबदलाचे मुख्य सूत्रधार असलेले शरद पवार लक्षात आले नाहीत तर नवलच..!! आपल्या ५० वर्षांपेक्षा अधिक काळाच्या राजकारणाचा अनुभव पणाला लावत शरद पवारांनी भाजपच्या लोकांना सत्तास्थापनेपासून दूर ठेवलं. हे करत असताना शिवसेनेच्या झोपलेल्या वाघाचा स्वाभिमानही त्यांनी जागृत करुन दिला. गेली ५ वर्षं आपल्या खिशात राजीनामा घेऊन फिरणाऱ्या शिवसेनेच्या आमदारांना इथून पुढे मात्र काही कालावधीसाठी का होईना सत्तेचा मनसोक्त आनंद उपभोगता येणार आहे. राजकारणात कुणीच कुणाचं कायमचं शत्रू नसतं हा विचार डोक्यात घेऊन महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकासआघाडीचं सरकार आता अस्तित्वात आलं. ‘मला माझ्या जुन्या मित्रांसोबत आता काम करता येईल’ हे छगन भुजबळ यांनी केलेलं सूचक विधान याबाबतीत खूप बोलकं आहे. शपथविधीसाठी देशभरातील विविध मान्यवरांना निमंत्रण दिली गेली होती. यामध्ये ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, सोनिया गांधी, मनमोहन सिंग यांचा प्रामुख्याने समावेश होता.

एका बाजूला हे सगळं सुरू असताना वयाच्या ऐंशीत पोहचलेल्या महाराष्ट्रातील सगळ्यात महत्वकांक्षी नेत्याला भावी काळात पंतप्रधानपद खुणावत नसेल का हा प्रश्न मनात आल्यावाचून राहत नाही. देशभर मोदी-शहा आपली व्युव्हरचना राबवत असताना शरद पवार नावाच्या योध्याने महाराष्ट्रातील त्यांची घौडदौड रोखली असल्याचं चित्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकांनी दाखवून दिलं. पवारांचं बोट धरून राजकारणात आल्याचं सांगणाऱ्या नरेंद्र मोदींना येत्या काळात धोबीपछाड देण्याचा प्रयत्न शरद पवार करणार का? याची चर्चा आता रंगू लागली आहे. देशभरात भाजपविरोधी आघाडीची मोट बांधण्याचा प्रयत्न शरद पवारांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत करून पाहिला होता मात्र मोदींच्या विरोधात सक्षम पर्याय न दिसल्याने भारतीयांनी पुन्हा आपलं मत मोदींच्या पारड्यात टाकलं. साध्या पण लोकांपर्यंत पोहचणाऱ्या परिणामकारक योजना राबवणाऱ्या नरेंद्र मोदींना भारताच्या कानाकोपऱ्यात जाण्यात गेल्या ५ वर्षांत कोणतीही अडचण आली नाही. मोदी सध्या आपली वैश्विक प्रतिमा बनवण्यात मग्न असताना शरद पवार यांनी मात्र देशाच्या ग्रामीण भागाचा कानोसा घ्यायला सुरुवात केली आहे. देशाचं संरक्षणमंत्रीपद, कृषिमंत्रीपद भूषवणाऱ्या शरद पवारांचा सर्वपक्षीय संपर्कही वाखाणण्याजोगा आहे.

राजीव गांधींच्या मृत्यूनंतर, २००९ साली संयुक्त पुरोगामी आघाडीची सत्ता आल्यानंतर शरद पवार यांची पंतप्रधान बनण्याची महत्वकांक्षा लपून राहिलेली नव्हती. अनेकदा काँग्रेसवासीयांनी साथ न दिल्याने शरद पवारांचं हे स्वप्न आतापर्यंत अधुरचं राहिलं आहे. सद्यस्थिती पाहता शरद पवार राजकारणात आणखी किती काळ सक्रिय राहणार हा प्रश्न असला तरी ते अजूनही थकलेले नाहीत हे त्यांनी वारंवार सिद्ध केलं आहे. स्वतःच्या पक्षाचे मोजकेच खासदार असले तरी देशाच्या राजकारणात कायम चर्चेत राहण्याची किमया शरद पवारांनी साधली आहे. एकूणच या राजकीय परिस्थितीत भाजपला सत्तेपासून रोखण्याचं शिवधनुष्य पेलण्यात शरद पवारांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आता त्यांना साथ देत बाकीचे राजकारणीसुद्धा शरद पवारांसाठी पंतप्रधानपदाची योग्य वेळ आणणार का याचं उत्तर येत्या काळात मिळेलच.

Leave a Comment