‘गाव तिथे बियर बार’ घोषणा देत दारुबंदी जिल्ह्यातच उमेदवाराचा प्रचार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चंद्रपूर प्रतिनिधी । राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली आणि सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले. निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच पक्षांनी आणि उमेदवारांनी कंबर कसली आहे. राज्यात उमेदवारांच्या प्रचार सभांनाही सुरुवात झाली. एकीकडे आपल्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी पक्षाचे दिग्गज नेते सभा घेत फिरत आहेत, तर दुसरीकडे कुणी सेलिब्रिटींची मदत घेत आहेत. निवडणुकीत चर्चेत राहण्यासाठी कोण काय करेल, याचा काहीही नेम नाही. चंद्रपूरच्या चिमूर मतदारसंघातही असंच काहीसं घडलं आहे. इथे अपक्ष उमेदवाराने प्रचारासाठी अजब शक्कल लढवली आहे. ज्या जिल्ह्यात दारुबंदी आहे, त्याच जिल्ह्यात या उमेदवाराने दारुला उघड समर्थन दिलं आहे.

चिमूर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार वनिता राऊत यांनी थेट जाहीरनामा प्रकाशित करत दारुला समर्थन दिलं आहे. त्यांनी ‘गाव तिथे बियर बार’ अशी घोषणा देत प्रचाराचा बार उडवला. दारुबंदी असलेल्या जिल्ह्यात वनिता राऊत यांनी ही घोषणा दिल्याने सध्या चंद्रपुरात सर्वत्र या घोषणेची चर्चा होत आहे. बेरोजगार तरुणांना दारु विक्रीचे परवाने, गाव तिथं बिअर बार, दारिद्र्य रेषेखालील लोकांना सवलतीत दारु, हे सर्व ऐकून कुणालाही धक्का बसेल. कारण, कुणालाही धक्का बसावा, अशाच या घोषणा आहेत. पण या घोषणा निवडणूक जिंकण्यासाठी एखादा उमेदवार करत असेल, तर त्याला म्हणावं, अशा संभ्रमात सध्या चिमूरचे मतदार आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर विधानसभा क्षेत्रातून निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या अपक्ष उमेदवार वनिता राऊत यांनी एक पत्रक काढलं, त्यात ही सर्व आश्वासनं देण्यात आली आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या चार वर्षांपूर्वी झालेल्या दारुबंदीचा कसा फज्जा उडाला, हे त्यांनी या पत्रकात नमूद करुन, मी निवडून आल्यास दारुबंदी कशी हटवता येईल, याचा प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं. चिमूर तालुक्यातील पेंढरी इथे राहणाऱ्या वनिता राऊत यांनी याच मुद्यावरुन प्रचाराला सुरुवात केली. त्यांच्या या अजब घोषणांची आता चर्चा होऊ लागली आहे. तसेच, त्यांनी काढलेलं पत्रही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

इतर काही बातम्या-

 

 

 

Leave a Comment