गडचिरोलीत पुन्हा दारूबंदीचा एल्गार; दारूचे साठे जाळून साजरा केला दसरा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

गडचिरोली प्रतिनिधी । दसर्‍याला आपण वाईट प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी रावणाचे प्रतिकात्मक दहन करतो. मोठमोठे रावण यासाठी तयार केले जातात. पण गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील पळसगाव इथं अनोखे रावण दहन पाहायला मिळाले. येथील महिलांनी चक्क दारूचे साठे जाळून दसरा साजरा केला. जिल्ह्यात दारूबंदी असून मुक्तिपथ अभियानाच्या माध्यमातून गावातील दारूविक्री बंद करण्यासाठी गाव संघटनांच्या माध्यमातून महिला रस्त्यावर उतरल्या आहेत.

दसर्‍याच्या दिवशी सकाळपासूनच पळसगावमध्ये सणाची लगबग सुरू होती. रावण दहनाचे नियोजन सुरू होते. याच दरम्यान पळसगाव – मोहटोला मार्गावर किन्नाळा परिसरातील जंगलात देशी दारूचा साठा लपवून ठेवला असल्याची माहिती गाव संघटनेच्या महिलांना मिळाली. सणाची तयारी व स्वयंपाक अर्धवट ठेवून १५ ते २० महिला व काही पुरुष किन्नाळा जंगलाकडे निघाले. सर्वांनी जंगलात शोधाशोध सुरू केली. यावेळी जमिनीखाली लपवून ठेवलेल्या देशी दारूच्या ५ पेट्या सापडल्या. या सर्व पेट्या त्यांनी गावात आणल्या आणि प्रतिकात्मक रावण दहन न करता या दारूच्या रावणाचेच दहन केले.

ही निवडणूक दारूमुक्त निवडणूक यासह इतरही घोषणांनी आसमंत दणाणून सोडला. निवडणूक काळात गावात दारू येऊ देणार नाही यासाठी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणार असल्याचेही या महिलांनी सांगितले.

Leave a Comment