‘मी राहुलभाऊ समर्थक’ लिहिलेले टी-शर्ट घालून युवकाची आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बुलडाणा प्रतिनिधी । ‘मी राहुलभाऊ समर्थक’ नावाचे टी-शर्ट घालून एका तरुणाने आत्महत्या केल्याने बुलडाणा सह राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. धाड येथे ही घटना घडली असून सतीश मोरे (२१) असे गळफास लावून आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. बुलडाणा जिल्ह्यातील राजकीय पक्षाचे टी-शर्ट घालून आत्महत्या करण्याची या आठवड्यातील ही दुसरी घटना आहे.

सतीश हा धाड येथील चिवडा विकणाऱ्या व्यापाऱ्याकडे चिवडा तयार काम करण्याचे काम करत होता. बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे कामावर जातो, असे सांगून घराबाहेर पडला होता. तो कामावरून घरी न आल्याने सर्वत्र शोध घेण्यात आला. गुरूवारी सकाळी धाड गावाच्या बाहेर दूध डेअरीजवळ असलेल्या सागवानच्या झाडाला त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. हे वृत्त वाऱ्यासारखी गावात पसरताच एकच खळबळ उडाली.

त्याच्या आत्महत्येचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. घटनेची माहिती मिळाताच धाड पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत, मृतदेह बुलडाणा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणी धाड पोलीस अधिक तपास करत आहेत. काँग्रेस आमदार राहुल बोन्द्रे यांच्या निवडणूक प्रचारासाठी ‘मी राहुल भाऊ समर्थक’ नावाचे टी-शर्ट छापण्यात आले आहेत. मयत सतीश हाच टी-शर्ट घालून मागील दोन दिवसांपासून फिरत असल्याचे शहरातील नागरिकांनी सांगितले.

धक्कादायक म्हणजे ४ दिवसांपूर्वी अशीच एक घटना जळगाव जामोद मतदार संघातील शेगाव तालुक्यात घडली होती. खातखेड येथील एका युवकाने ‘पुन्हा आणूया आपले सरकार’ असे लिहिलेले भाजपचे टी-शर्ट परिधान करून आत्महत्या केली होती. या दोन्ही घटनेमुळे जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले आहे.

Leave a Comment