अबब !! मिरज लातूर पाण्याच्या रेल्वेचं बिल १० कोटी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लातूर प्रतिनिधी | दुष्काळ आणि तीव्र पाणी टंचाईमुळे २०१६ मध्ये लातूरला सांगली जिल्ह्यातील मिरजहून रेल्वेने पाणी दिलं गेलं होतं. आता पुन्हा एकदा लातूरला रेल्वेने पाणी पुरवठा करण्याची परिस्थिती निर्माण झालेली असताना रेल्वे विभागाने महापालिकेला तब्बल १० कोटीचं बिल दिलं आहे. दरम्यान तत्कालीन रेल्वेमंत्र्यांनी लातूरची दुष्काळी परिस्थिती पाहून मोफत पाणी देण्याचे आश्वासन दिल्यानंतर १० कोटीचे बिल आल्यामुळे महापालिका बुचकुळ्यात पडली आहे.

दुष्काळात रेल्वेनं पाणी द्यावं लागलेलं महाराष्ट्रातील एकमेव शहर म्हणून ओळखलं जातं ते लातूर… २०१६ च्या भीषण दुष्काळात लातूरला सांगली जिल्ह्यातील मिरजहून रेल्वेनं पाणी पुरवठा करावा लागला होता. रेल्वेच्या या अशा वॅगनने जवळपास ०४ महिन्यातील १११ दिवस मिरजहून लातूरला पाणी येत होतं. या काळात रेल्वने आणलेलं पाणी फिल्टर करून लातूरकरांना टँकरद्वारे २०० लिटर प्रमाणे वितरित केलं जात होतं. १२ एप्रिल २०१६ रोजी सुरु झालेली ही पाण्याची रेल्वे ०९ ऑगस्ट २०१६ बंद झाली होती. यावर्षी लातूरची परिस्थिती २०१६ पेक्षा भीषण आहे. कारण ऐन पावसाळयात लातूरला पाणी पुरवठा करणारे मांजरा धरणं कोरडे पडले आहे. त्यामुळे लातूरला परत रेल्वेने पाणी पुरवठा करण्याची वेळ आलेली असताना रेल्वे विभागाने मोठा झटका लातूर महापालिकेला दिला आहे.

२०१६ मध्ये एकूण १११ दिवस लातूरला मिरजहून पाणी देण्यात आलं होतं. या पाण्याचे ११ कोटी ८० लाख ८८ हजार ६२५ रुपये बिल करण्यात आलं. त्यापैकी ०१ कोटी ८७ लाख ७६ हजार ३०० रुपयांचे बिल बॉम्बे चेंबर्स ऑफ कॉमर्सने तर २ लाख ८९ हजार ६३४ रुपयांचे बिल मिरजमधील एका स्वयंसेवी संघटनेने रेल्वेला अदाही केलं होतं. उर्वरित ०९ कोटी ९० लाख ३० हजार ५१८ रुपयांचे बिल रेल्वेने महापालिकेला पाठवलं आहे.

लातूरला मोफत पाणी देणार असल्याचं ट्विट तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केलं होतं. असे असतानाही ०९ कोटी ९० लाख ३० हजार ५१८ रुपयांचे बिल आल्यामुळे महापालिका प्रशासन बुचकुळ्यात पडलं आहे. महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याचं महापालिकेचे उपायुक्त संभाजी वाघमारे यांनी प्रशासनातर्फे स्पष्ट केलं आहे.

एकूणच लातूर शहरावर पुन्हा एकदा रेल्वेने पाणी आणण्याची वेळ आलेली असताना रेल्वे प्रशासनाने पाठविलेल्या १० कोटीच्या बिलामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. त्यामुळे महापालिकेतील भाजपचे सत्ताधारी, राज्यातील आणि केंद्रातील भाजपच्या सत्ताधाऱ्यांकडून हे बिल माफ करून घेतात की हे बिल भरतात याकडे लातूरकरांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment