स्वातंत्र्य दिवस @७३…

0 0

स्वातंत्र्य दिन विशेष | साहेब लोकांच्या (ब्रिटिश) जोखडातून आपला भारत देश आज रोजी १९४७ ला स्वतंत्र झाला आणि बघता बघता आपला देश आज ७३ व्या स्वातंत्रदिना पर्यंत पोहचला. त्यासोबतच देशात लोकशाही पर्व सुरू झाले आणि तेही या स्वातंत्र्याबरोबर पुढे पुढे जात भारताला समृद्ध करत आले.

आज स्वातंत्र्याचे ७३ वे वर्ष साजरा करत असताना भारताचा स्वातंत्र्यानंतरचा इतिहास जाणून घेणे तितकेच अगत्याचे आहे. ‘सोन्याचा धूर’ निघत असलेल्या देशाला परत धुळीमध्ये मिळवून इंग्रज साहेब निघून गेले. भारताचे दूरदृष्टी असणारे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि संपूर्ण भारतीयांनी आपल्या भारत भुमीला पुन्हा पूर्वीच्या उंचीवर नेण्यासाठी पाऊले टाकली व आज नाही म्हणता आपला देश आज अनेक टप्प्यांवर आघाडी घेतांना दिसत आहे.

स्वातंत्र्यानंतर पंचवार्षिक योजना आखून एकीकडे कृषी तर दुसरीकडे औद्योगिक क्षेत्रात प्रगती साधण्याचा प्रयत्न तत्कालीन राज्यकर्त्यांनी केला . ज्या देशाला विदेशात जनावरांसाठी असलेले अन्न आयात करून पोट भरावे लागायचे त्याच देशाने पुढील काही वर्षांतच हरितक्रांती घडवून अन्नधान्यात स्वयंपूर्ण होवून जगात अन्नधान्य निर्यात करणारा देश बनला आहे. ही प्रगती साधत असतांना दुसरीकडे विक्रम साराभाई यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) सारखी संस्था स्थापन करून अंतराळ मोहिमा आखून आघाडीच्या मोजक्या देशांच्या पंक्तीत भारत जाऊन बसला आहे. पहिले पंतप्रधान नेहरु पासून सध्याचे पंतप्रधान मोदीं पर्यंत सर्वानीच परराष्ट्र धोरणाला महत्व देऊन संपूर्ण जगात मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यावर भर दिला आहे. त्याचेच सकारात्मक परिणाम आज बघायला मिळत आहेत.

आजच्या घडीला सातवी मोठी अर्थव्यवस्था असलेला भारत देश येत्या काही वर्षात जगातील महाशक्ती व महासत्ता म्हणून ओळखला जाईल. केवळ आर्थिक, लष्करी या पातळीवर नव्हे तर भारत जगाला न्याय, नीती, शांतीचा संदेश देणारा असेल. सद्यस्थितीला भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. तरूणांना शिक्षण व कुशलतेच्या जोरावर योग्य नोकऱ्या मिळाल्या तर देश अधिक संपन्न होईल. आजही दारिद्र्य, जातीयता, प्रांतवाद यासारख्या काही गोष्टी देशाच्या विकासाच्या आड येत असल्या तरी सर्व भारतीय मिळून यावर नक्कीच मात करतील आणि भारताला सदैव प्रगतीकडे नेण्यासाठी कटीबद्ध राहतील. सर्व भारतवासीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी क्रांतिकारक, स्वातंत्र्यसेनानी यांनी
केलेल्या त्यागाला सलाम करुयात.

जय हिंद!

अतुल मोरे
ता.मंठा जि.जालना

Leave a Reply

x Close

Like Us On Facebook