हर्षवर्धन पाटील ही भाजपमध्ये जाणार ; बुधवारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ठरवणार पुढील दिशा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

इंदापूर प्रतिनिधी | काँग्रेस नेते तसेच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आगामी विधानसभा भाजपमधून लढवावी असा आग्रह त्यांच्या कार्यकर्त्यांमधून होत आहे. याच पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करून पुढील राजकीय दिशा ठरवण्याचा निर्धार केला आहे. हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी इंदापूरची जागा सोडण्यास राष्ट्रवादी तयार नाही. त्यामुळे पाटील यांचे मन भाजपकडे वळले आहे अशी चर्चा सध्या इंदापूरमध्ये रंगत असल्याचे बघायला मिळते आहे.

२०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेस स्वतंत्र लढल्याने इंदापूर मतदारसंघातून हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला. राष्ट्रवादीच्या दत्तात्रय भरणे यांनी त्यांचा पराभव केला. तर त्यावेळी तुटलेल्या जनसंपर्कामुळे हर्षवर्धन पाटील यांना पराभूत व्हावे लागले असे देखील बोलले जाते आहे.त्यानंतर आता पाच वर्ष हर्षवर्धन पाटील यांनी तगडा जनसंपर्क ठेवून मतदारसंघात मतांची चांगलीच बांधी केली आहे. मात्र राष्ट्रवादी या मतदारसंघावरचा आपला हक्क सोडायला तयार नाही. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांना अपक्ष उभा राहणे किंवा भाजपमध्ये जाणे हे दोनच पर्याय दिसतात. त्यातील भाजप प्रवेशाचा पर्याय हर्षवर्धन पाटील निवडण्याची शक्यता अधिक आहे.

लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा प्रचार करण्यासाठी पवार कुटुंबीयांनी हर्षवर्धन पाटील यांच्या घराचे उंबरे झिजवले. मात्र आता विधानसभेची निवडणूक येताच इंदापूरची जागा सोडण्यासाठी हात वर केल्याची स्थिती निर्माण केली आहे. याचा साक्षात्कार देण्यासाठी शिवस्वराज्य यात्रेची जाहीर सभा देखील इंदापूर मध्ये घेतली जाणार असल्याचे बोलले जाते आहे. या सर्व तयारीने हेच दिसून येते की राष्ट्रवादी हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी जागा सोडायला कोणत्याही परिस्थितीत तयार होणार नाही. त्यामुळे येत्या बुधवारी हर्षवर्धन पाटील यांनी बोलावलेला कार्यकर्त्यांचा मेळावा महत्वाचा आहे. त्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Leave a Comment