पाथरी विधानसभा ; आयात उमेदवारांना नो एंट्री ; भूमिपुत्रांची होणार चलती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी | गजानन घुमरे, 

ऑक्टोबरमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पाथरी विधानसभा मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात दोन वेळा सुरुंग लावण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष  यशस्वी झाला आहे. तर एक वेळ अपक्ष उमेदवाराने देखील बाजी मारली आहे.

1990 पासून सलग तीन वेळा शिवसेनेने माजी आमदार हरिभाऊ लहाने यांच्या रूपाने हॅट्रिक केली होती. 2004 मध्ये राष्ट्रवादीकडून विधान परिषदेचे विद्यमान आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी शिवसेनेचे विजयी घोडदौड रोखली होती . यानंतर 2009 साली पाथरी विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना करण्यात आली त्यापूर्वी सेलू तालुका व पाथरी तालुका मिळून विधानसभा मतदारसंघ होता .पुनर्रचनेनंतर मात्र शेजारील शिंगणापूर मतदारसंघ पाथरी विधानसभेत विसर्जित करण्यात आला . त्यामुळे मानवत ,सोनपेठ संपूर्ण तालुके तर परभणी तालक्यातील काही गावे असा मिळून नवीन पाथरी विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. पुनर्रचनेनंतर मात्र कोणत्याही एका पक्षाला सातत्याने विजय मिळवता आलेला नाही. 2009 साली मीरा रेंगे यांच्या रूपाने शिवसेनेला विजय मिळवता आला परंतु 2014च्या निवडणुकांमध्ये अपक्ष उमेदवार मोहन फड यांनी सर्वच पक्षांना धूळ चारत विजय मिळवला .यावेळी सर्वच पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या होत्या. 2014 नंतर आज पर्यंत बरीच राजकीय समीकरणे बदलली आहेत. प्रत्येक वेळी आयात केलेला उमेदवार पाथरी विधानसभा मतदार संघावर राज्य करत असल्याने त्याला स्थानिक लोकांचे प्रश्न समजत नसल्याची मतदारसंघातील लोकांची भावना आहे. त्यामुळे आता या निवडणुकीमध्ये भूमिपुत्रांनी किल्ला लढवण्याचे ठरवल्याचे दिसत आहे.

त्याची कारणेही तशी आहे पाथरी शहर व तालुका सोडले तर मानवत सोनपेठ व परभणी तालुक्यातील मतदारसंघात समाविष्ट असलेल्या गावांचा विकास न झाल्याने स्थानिक उमेदवारच हे प्रश्न सोडू शकतात अशी नविन मतदारांची भावना आहे.

विद्यमान आमदार मोहन फड निवडून आल्यानंतर शिवसेना व नाराजी नाट्यानंतर भाजप असा त्यांचा पाच वर्षाचा प्रवास आहे .पाच वर्षांमध्ये त्यांच्याकडून मतदारसंघातील रस्ते व त्यांनी केलेले आरोग्य सेवेचे काम त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे पण युतीच्या तडजोडी मध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने येणारी विधानसभा निवडणूक भाजपकडून लढवण्यासाठी त्यांना हा मतदारसंघ भाजपसाठी सोडवून घ्यावा लागणार आहे. जिंतुर व गंगाखेड मतदारसंघ भाजपसाठी सोडवण्यास स्थानिक नेते प्रयत्नशील असल्याने पाथरीच्या रुपाने तिसरा मतदारसंघ मिळणे याची धुसर शक्यता आहे. त्यामुळे विद्यमान आमदार मोहन फड हे परत अपक्ष लढणार हे निश्चित आहे.

आघाडीकडून काँग्रेस पक्षाला हा मतदारसंघ सुटलेला असल्याने माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर दावेदार आहेत . मागील दोन वर्षापासुन त्यांनी या मतदारसंघात संपर्क वाढवला आहे. तर त्यांच्या सुनबाई प्रेरणा वरपुडकर यांनीही आरोग्य सेवेच्या माध्यमातून गावेगावी भेटी दिल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसची या मतदारसंघात चांगली बांधणी आहे .स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये मोठे बळ त्यांच्यापाशी असुन कार्यकर्त्यांची मोठी फळी येथे आहे .विधानपरिषदेचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांचे खंबीर नेतृत्व जमेची बाजु आहे. 2014 मध्ये आघाडी तुटल्याने राष्ट्रवादी पक्षाने कॉंग्रेस पक्षाच्या विरोधात दोन हात केले होते पण काँग्रेसने अधिकचे मताधिक्य मिळवले होते.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार राजेश विटेकरांना या मतदार संघातून मताधिक्य मिळाल्याने राष्ट्रवादीकडून जागेवर दावा केला जातो आहे . राजेश विटेकरांना संधी द्यावी अशी स्थानिक कार्यकर्त्यांची मागणी आहे . तसे झाल्यास राजेश विटेकर व जि.प . उपाध्यक्षा भावनाताई नखाते राष्ट्रवादी पक्षाकडून इच्छुक आहेत .

शिवसेनेचा गड असल्याने शिवसेनेकडून यावेळी स्थानिक भूमिपुत्रांची इच्छूक म्हणून दावेदारी आहे त्यामध्ये जिल्हाप्रमुख सुरेश ढगे, उपजिल्हाप्रमुख रविंद्र धर्मे, पाथरी तालुका प्रमुख मुंजाभाऊ कोल्हे, मानवतहून विष्णू मांडे, डॉ . जगदीश शिंदे यांचा समावेश आहे .डॉ . जगदीश शिंदेनीे मागील दिड वर्षापासुन इच्छूक म्हणुन मतदारसंघात जनसंपर्क वाढवला होता . मागील आठ दिवसात मात्र यात दोन नावे आणखी जोडली गेले आहेत . कान्सुर गावचे भूमिपुत्र डॉ . राम शिंदे व समृध्दी साखर कारखान्याचे चेअरमन सतीष घाडगे रुपाने इच्छूकात भर पडली आहे .डॉ.राम अच्युतराव शिंदे यांच्या पारड्यात परभणीचे खासदार संजय जाधव यांचे वजन असल्याची चर्चा असुन मातोश्री वरुन आदेश मिळण्याची शक्यता असल्याने डॉ. राम शिंदेनी मतदारसंघात भेटीगाठीचा धडाका लावला आहे.
या सगळ्यामध्ये नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीला मताचा मोठा टक्का मिळालेले पाथरी मतदारसंघातील होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये वंचित आघाडी फॅक्टर प्रभावी ठरण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीकडून लढण्यास इच्छुकांची भाऊगर्दी आहे. त्यामध्ये 2014 च्या निवडणुकीत मोहन फड यांना निवडून आणण्यात महत्त्वाचा वाटा उचलणारे व कुणबी मराठा समाजाचे मोठ बांधणारे सुनील बावळे पाटील वंचित बहुजन आघाडीकडून इच्छुक आहेत .याशिवाय विलास बाबर , टि.डी. रुमाले, मो. इल्यास अकबर मनियार, अरुण ढवळे यांच्यासह दहा ते पंधरा जणांनी मुलाखती दिल्या असुन विधानसभा लढण्यास इच्छूक आहेत .

इच्छुकांची भाऊगर्दी असली तरी युती-आघाडी यांच्या निर्णयानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे .सोबत विधानपरिषदेचे आमदार बाबाजानी दुर्राणी व शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव यांचे वजन कोणाच्या पारड्यात पडत यावरून विधानसभेचा उमेदवार,  तर शेवटी सुज्ञ मतदारच आमदार ठरवणार आहेत .

महत्वाच्या बातम्या

इंदापूरच्या जागेवरून पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादीत कलगीतूर ; जागा सोडण्यास शरद पवारांचा नकार

गणपतराव देशमुखांची विधानसभा निवडणुकीतून माघार ; या कारणामुळे निवडणूक लढणार नाहीत

कराड येथील जुना कृष्णापूल कोसळला

मुंबईनंतर राष्ट्रवादीला बसणार नव्या मुंबईमध्ये झटका ; पवारांचा निकटवर्तीय नेता भाजपच्या वाटेवर

या जिल्ह्याचा राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष भाजपमध्ये ; माजी मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात करणार उमेदवारी?

येडियुरप्पांनी जिंकला विश्वासदर्शक ठराव ; मंत्रीमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा

राज ठाकरेंनी घेतली जयंत पाटलांची भेट

Leave a Comment