गोपीचंद पडळकर वंचितला ठोकणार रामराम ; या पक्षात करणार प्रवेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ज्याप्रमाणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पक्षांतरणाचा फटका बसतोय तसाच फटका आता महाराष्ट्राच्या राजकारणात आपली पकड मजबूत करू पाहणाऱ्या वंचित बहुजन आघाडी पक्षाला बसण्याची शक्यता. कारण वंचित आघाडीतील वरच्या फळीतील नेते आणि धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर हे पक्षांतरणाच्या तयारीत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पडळकर शेतकरी कामगार पक्षात जाणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

सांगोल्याचे शेकापचे आमदार गणपतराव देशमुख यांनी राजकारणातून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे. देशमुख यांनी सांगोल्यातून निवडून येण्याचा विक्रम केला आहे. त्यांनी तब्बल ५५ वर्षे सांगोला मतदार संघाचे विधानसभेत प्रतिनिधीत्व केले. सांगोला मतदारसंघ शेकापचा बालेकिल्ला राहिला आहे. गणपतराव देशमुख यांनी १९६२ मध्ये पहिल्यांदा सांगोल्यातून विधानसभा निवडणूक लढवली होती. केवळ १९७२ आणि १९९५ मध्ये त्यांना येथून पराभव पत्करावा लागला होता.

शेकापचा बालेकिल्ला असलेल्या सांगोला मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी गोपीचंद पडळकर इच्छूक आहेत. वंचितकडून विधानसभेला निवडून येण्याची खात्री नसल्यामुळेच पडळकर शेकापमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. या संदर्भात गणपतराव देशमुख यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच ते पक्षांतरणाचा निर्णय घेणार आहे.

दरम्यान, सांगोल्यात धनगर समजाचे मताधिक्य मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच धनगर समाजाचे नेते गणपतराव देशमुख यांचा पाठिंबा आणि समाजातील युवकांची साथ मिळाल्यास पडळकर यांचा सांगोल्यातून विधानसभेत जाण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment