सातारा | गुन्ह्यात मदत करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी वाई पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार रमेश कोळी याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. रमेश कोळी यांची निवृत्ती आवघी काही महिन्यांवर आलेली असतानाच त्यांना एसीबी पथकाने ताब्यात घेतल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, वाई पोलीस ठाण्यात गंभीर दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असून त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तक्रारदार रमेश कोळी याला भेटले होते. गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल असल्याने त्यासाठी 4 हजार रुपयाची मागणी करण्यात आली होती. लाचेची मागणी झाल्याने तक्रार याने सातारा एसीबी जाऊन तक्रार दिली.
एसीबी विभागाचे पोलिस उपअधीक्षक अशोक शिर्के यांनी तक्रार दाखल करून घेण्याची सूचना केली. तक्रार दाखल झाल्यानंतर पडताळणी मध्ये लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाले. तडजोडीअंती 2 हजार रुपये देण्याचे ठरले. लाचेची रक्कम स्वीकारताना एसीबीने ट्रॅप लावला होता. पोलिसावर ट्रॅप झाल्याने वाईसह सातारा पोलीस दलात मोठी चर्चा रंगली होती. रात्री उशिरा गुन्हा दाखल करून एसीबीने संशयिताला ताब्यात घेतले आले आहे.