सून विहिरीत पाय घसरुन पडल्याचा रचला बनाव, सासू-सासऱ्यांसह नऊ जणांवर गुन्हा दाखल

बुलडाणा : हॅलो महाराष्ट्र – बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील शिर्ला नेमाने या ठिकाणी दोन दिवसांपूर्वी शेतातील विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेलेल्या 24 वर्षीय विवाहितेचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली होती. मात्र हि महिला विहिरीत पाय घसरुन पडल्याचा सासरच्या मंडळींनी केलेला बनाव अखेर उघड झाला आहे. विवाहितेच्या मृत्यू प्रकरणी सासरच्या 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेने सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची तक्रार तिच्या भावाने केली होती. यानंतर हिवरखेड पोलिसांनी गुन्हा दाखल करत पती आणि सासऱ्याला अटक केली आहे.

काय आहे प्रकरण?
दोन दिवसांपूर्वी खामगाव तालुक्यातील शिर्ला नेमाने या ठिकाणी शेतातील विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेलेल्या 24 वर्षीय विवाहितेचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली होती. यानंतर ती विहिरीत पडली नसून, तिने सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची तक्रार मृत महिलेच्या भावाने हिवरखेड पोलीस ठाण्यात दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून मृत महिलेच्या पतीला आणि सासऱ्याला अटक केली आहे.

पाय घसरून विहिरीत पडल्याचा बनाव
खामगाव तालुक्यातील शिर्ला नेमाने येथील 24 वर्षीय लक्ष्मी गजानन राठोड ही दोन दिवसांपूर्वी शेतात हरभरा सोंगण्यासाठी गेली होती. त्यावेळी दुपारी शेतातील विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेल्यानंतर तिने विहिरीत उडी घेत आपले आयुष्य संपवले. मात्र या महिलेचा पाय घसरून विहिरीत पडल्याचे तिच्या कुटुंबियांनी पोलिसांना सांगितले होते.

सासरच्या नऊ जणांनी छळ केल्याचा आरोप
मृत लक्ष्मीच्या भावाने हिवरखेड पोलीस ठाण्यात लक्ष्मीचा पती, सासू, सासरा, दीर यांच्यासह जावा तिचा छळ करत होत्या, त्यामुळे तिने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली, अशी तक्रार दाखल केली आहे. तक्रार दाखल झालेल्यांमध्ये लक्ष्मीचा पती गजानन राठोड, सासरा जानकीराम राठोड, सासू फुलाबाई राठोड, गजाननचे तीन भाऊ , तिघांच्या पत्नी अशा नऊ जणांचा समावेश आहे. यांच्यापैकी जानकीराम राठोड आणि गजानन राठोड या दोघा बापलेकांना पोलिसांनी अटक केली आहे. हिवरखेड पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.