भेंडवळ घटमांडणीचं भाकित: पृथ्वीवर महामारीचं संकट, देशाची आर्थिक स्थिती खालवणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बुलडाणा ।  शेती पीक, पर्जन्य हवामान आणि इतर बाबतीतील भाकीत वर्तवणारी ३५० वर्षांची अखंड परंपरा असलेल्या भेंडवळची घटमांडणी यंदा कोरोना संकटामुळे खंडीत होईल का? असं वाटत होतं. मात्र तसं घडलेलं नाही. भेंडवळची परंपरा कायम राहिली आहे. मात्र, दरवर्षी मोठ्या संख्येनं राज्यभरातून येणारा शेतकरी वर्ग लॉकडाऊनमुळे यंदा भेंडवळमध्ये येऊ शकला नाही. काल अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या घटमांडणीतून वर्तवलेलं भाकित आता समोर आलं आहे.

यावर्षी चारही महिन्यात पाऊस सर्वसाधारण आणि चांगल्या स्वरुपाचा राहणार असल्याचं भाकीत वर्तविण्यात आलं आहे. परंतु याचसोबत अतिवृष्टी आणि नासाडीही होईल असंही सांगण्यात आलं आहे. पृथ्वीवर नैसर्गिक रोगराईचे संकट येईल आणि देशाची आर्थिक स्थितीही कमकुवत होईल असा अंदाज या भाकितात नोंदवण्यात आला आहे. राजा कायम आहे, मात्र आर्थिक स्थिती खालावल्याने राजावरचा तणाव वाढेल. परकीय शत्रूची घुसखोरी होईल त्यामुळं संरक्षण खात्यावर ताण वाढेल. तसंच त्यामुळे त्रास सहन करावा लागेल असंही या भाकितात म्हटलं आहे. सारंगधर महाराज यांनी हे भाकित वर्तवलं आहे.

पिक अंदाजाबाबत ते म्हणतात, “ज्वारी, तूर, गहू, कपाशी, सोयाबीन यांचे पिक चांगले येईल. पहिल्या महिन्यात पेरण्या केल्या जातील मात्र चारा टंचाई भासेल. जमिनील पाण्याची पातळी वाढेल. पाऊस चांगला होईल.” अशी भविष्यवाणी भेंडवळची मांडणी सुरु करणाऱ्या चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज वाघ यांनी वर्तविली आहे. ३५० वर्षांपूर्वी बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात असलेल्या भेंडवळ येथील वाघ कुळातील चंद्रभान महाराज यांनी या भविष्यवाणीला सुरुवात केली. कृषीविषयक पिकं, पर्जन्यमान, देशाचं संरक्षण, व्यापार आणि आरोग्यविषयक तसेच राजकारण याबाबत वर्षभराचं भाकित यामध्ये नोंदवलं जातं. भेंडवळ येथे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर गावजवळच्या पूर्वेकडील वाघ शेतात मांडण्यात येणाऱ्या घटाची मांडणी व दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी घटाचे सूक्ष्म निरीक्षण करुन भाकित वर्तवण्यात येतं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment