Wednesday, February 1, 2023

संतापजनक ! आजारी वडिलांचे झाले ओझे; मुलाने ब्लेडने गळा चिरून संपवले

- Advertisement -

उरुळी कांचन : हॅलो महाराष्ट्र – उरुळी कांचन या ठिकाणी वडिल आणि मुलगा यांच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये एका मुलाने आपल्या वयोवृद्ध वडिलांच्या आजारीपणाला कंटाळून त्यांची ब्लेडनं गळा चिरून निर्घृण हत्या केली आहे. हत्या केल्यानंतर आरोपी मुलाने तीन दिवस मृतदेह घरातच गुंडाळून ठेवला होता. यानंतर घरातून दुर्गंधी यायला सुरुवात झाल्यानंतर या प्रकरणाचा उलघडा झाला आहे. यानंतर उरुळी कांचन पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे.

मृत वडिलांचे नाव रहिम गुलाब शेख असे आहे. ते मागच्या काही वर्षांपासून दीर्घ आजाराने ग्रस्त होते. आजारी वडिलांच्या उपचारासाठी पैसे नसल्याने ते घरातच पडून होते. यानंतर 8 जून रोजी मृत रहिम गुलाब शेख आणि आरोपी मुलगा नईम रहिम शेख यांच्यात जोरदार भांडण झाले. यानंतर आरोपीने दारूच्या नशेत आपल्या वडिलांची धारदार ब्लेडने गळा चिरून हत्या केली आहे. यानंतर त्याने आपल्या वडिलांचा मृतदेह घरातच गुंडाळून ठेवला. हत्येच्या तीन दिवसांनंतर मृतदेहाला दुर्गंधी सुटली तेव्हा या घटनेचा उलघडा झाला.

- Advertisement -

या घटनेची माहिती मिळताच लोहमार्गाच्या बाजूला दारूच्या नशेत निवांत झोपलेल्या मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. नईमला अटक झाल्यावर ‘मैंने उनको आजाद कर दिया’ असे तो पोलिसांना सांगत होता. आरोपी नईम रहिम शेखचे काही दिवसांपूर्वी आपल्या बायकोसोबत भांडण झाले होते,त्यामुळे तो आपल्या वडिलांना घेऊन बहिण शहेनाज रशीदखान जमादार यांच्याकडे राहत होता. यानंतर आरोपीने आपल्या बहिणीच्याच घरी आपल्या वडिलांची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलगा नईम शेख याला अटक केली आहे. तसेच या प्रकरणात बहिणीचा काही सहभाग आहे का याचा तपास पोलीस करत आहेत.