भरदिवसा घरफोडी : मुलीच्या लग्नातील आहेराची रक्कम, मोबाईल चोरट्यांनी केला लंपास

महाबळेश्वर प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

महाबळेश्वर शहरापासून 2 कि.मी अंतरावर असलेल्या रांजणवाडी येथे भरदिवसा घरफोडीची घटना घडली. नुरमोहंमद नजीर मुलाणी (वय- 55) यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडुन चोरटयांनी घरात प्रवेश केला. घरातील कपाटात मुलीच्या लग्नाचा आहेराची रोख रक्कम 45 हजार व एक मोबाईल चोरटयांनी लंपास केला. या बाबत महाबळेश्वर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरटयां विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असुन भरदिवसा झालेल्या या घरफोडीच्या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ माजली आहे.

नुरमोहंमद यांची मुलगी परळी (ता. जि. सातारा) येथे राहते. तिच्या घरी असलेल्या धार्मिक कार्यक्रमासाठी नुरमोहंमद यांनी 28 जुन रोजी सकाळी दहा वाजता आपल्या घरातील सर्व सदस्यांना सोबत घेवुन निघाले, बाहेर पडताना घराला व्यवस्थित कुलुप लावले होते. तेथुन सायंकाळी पुन्हा नुरमोहंमद हे आपल्या घरी आले. तेव्हा आपल्या घरी चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. घराच्या दरवाजाचे कुलूप तोडुन अज्ञात चोरटे आत शिरले. त्यांनी घरातील कपाटाचे कुलूप तोडुन कपाटातील रोख रक्कम 45 हजार रूपये लांबविले. नुकतेच मुलीचे लग्न झाले होते, त्या मुलीच्या लग्नात मिळालेल्या आहेराची ती रक्कम होती असे नुरमोहंमद यांनी सांगितले.

चोरटे घरातील वरच्या मजल्यावर देखील गेले होते. तेथे त्यांना काही चीज वस्तु मिळाल्या नाही, परंतु त्या शोधण्यासाठी त्यांनी घरातील सामानाची नासधुस केली होती. घराच्या हॉल मध्ये व बेडरूम मध्ये सर्वत्र सामान अस्ताव्यस्त पसरले होते. रात्री उशीरा नुरमोहंमद यांनी महाबळेश्वर पोलिस ठाण्यात या बाबत तक्रार दाखल केली. आज महाबळेश्वर पोलिसांनी चोरीच्या तपासासाठी आज श्वानपथक व हस्तरेषा तज्ञांना पाचारण केले होते. तज्ञांनी सर्व नमुने हस्तगत केले आहेत. भरदिवसा झालेल्या या घरफोडीमुळे रांजणवाडीत चांगलीच खळबळ माजली आहे. दरम्यान घरफोडी करणाऱ्या चोरटयांचा तपास करण्याचे आव्हान महाबळेश्वर पोलिसां समोर असुन पोलिस निरीक्षक बी.ए.कोंडुभैरी यांच्या मार्गदर्शनाखाली चोरीचा तपास सुरू आहे.