भूमिपूजन होऊन दोन वर्षे उलटूनही बसपोर्टचे काम ‘लाल फितीत’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाच्या जागी अद्ययावत बसस्थानक उभारणीसाठी औरंगाबादकरांना आणखी काही वर्षे वाट पाहावी लागणार आहे. मनपाने विकास शुल्क माफ करण्याच्या गोंधळात २ वर्षे उलटली. त्यामुळे आता कामाचा १८ महिन्यांचा कालावधी संपल्याचे कारण पुढे करून कंत्राटदाराने करार संपवित कामाला नकार दिला आहे. यामागे वाढलेली महागाई आणि कोरोनामुळे बिघडलेले अर्थचक्र हे कारण समजते. त्यामुळे बसस्थानकाच्या कामासाठी आता नव्याने निविदा प्रक्रिया राबवावा लागणार आहे.

बसपोर्टसह मध्यवर्ती बसस्थानकाच्या पुनर्बाधणीच्या कामाचे २८ ऑगस्ट २०१ ९ रोजी तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. परंतु भूमिपूजनानंतर दोन वर्षे उलटूनही प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालेली नाही. मध्यवर्ती बसस्थानकाच्या नव्या इमारतीसाठी एसटी महामंडळाने बांधकाम परवानगी मागितली. त्यावर महापालिकेने महामंडळाला 1.62 कोटी रुपये विकास शुल्क भरण्यास सांगितले. परंतु एसटी ही शासनाचाच एक भाग असल्याने महामंडळाने हे विकास शुल्क माफ करण्याची मागणी केली. वारंवार चर्चा झाली. यात दोन वर्षे लोटली. महापालिकेने दोन दिवसांपूर्वीच हे विकास शुल्क माफ केले. मात्र, त्यापूर्वीच कंत्राटदाराने एसटी महामंडळाकडे बसस्थानक बांधणी संदर्भातील करार संपविण्याची विनंती केली. ही विनंती मान्य झाली असून कंत्राटदाराने भरलेले १ कोटी ८४ लाख रुपये परत करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे कंत्राटदार आणि एसटी महामंडळाच्या विभागीय अभियंता कार्यालयातर्फे सांगण्यात आले.

५० वर्षे जुने बसस्थानक –
मध्यवर्ती बसस्थानक बांधून ५० वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटला आहे. आजघडीला बसस्थानकाची प्रचंड दुरवस्था झालेली आहे. प्लास्टर निखळल्याने जागोजागी छतातील लोखंडी सळया बाहेर आल्या आहेत. ठिकठिकाणी भिंतीतून पावसाचे पाणी गळते. इमारतीवर ठिकठिकाणी झाडे वाढली असून, त्यांची मुळे जमिनीपर्यंत पोहोचली आहेत. त्यामुळे बसस्थानकाची अवस्था धोकादायक झाली आहे.
प्रत्यक्षात कधी होणार ? –
सिडको बसस्थानकाच्या जागी विमानतळाच्या धर्तीवर बसस्थानक उभारण्याचे नियोजन आहे. परंतु बसपोर्टच्या जागेसाठी सिडकोकडून एनओसी मिळणे बाकी असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अद्ययावत बसस्थानक आणि बसपोर्ट कधी होणार, असा सवाल प्रवाशांतून उपस्थित केला जात आहे.

Leave a Comment