हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : बहुचर्चित नागरिकत्व दुरुस्ती कायदा मुस्लिम विरोधी नसल्याचे मत अभिनेता रजनीकांतने व्यक्त केले आणि केंद्राच्या या कायद्याला पाठींबा दिला. ‘नागरिकत्व कायदा हा देशातील मुस्लिमांच्या विरोधात नाही. या कायद्यामुळं एकाही मुस्लिमाला फटका बसल्यास त्यासाठी मी सर्वात आधी आंदोलन करेन,’ अशी हमी रजनीकांत यांनी दिली आहे.
चेन्नई येथील निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते. ‘सीएए कायद्यामुळं मुस्लिम नागरिकांना कुठलाही फटका बसणार नाही. तसं झाल्यास सर्वात प्रथम मी रस्त्यावर उतरून सीएए विरोधी आंदोलनाचं नेतृत्व करेन,’ असं ते म्हणाले. भारतीय मुस्लिमांना कुणीही दूर लोटू शकत नाही. ज्यांना पाकिस्तानात जायचं होतं, ते फाळणीच्या वेळीच तिकडं गेले आहेत. मात्र, भारताला मायभूमी मानणारे मुस्लिम कुठेही गेले नाहीत.
सीएए कायद्याच्या मुद्द्यावरून त्यांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचे प्रयत्न काही लोक करत आहेत. काही राजकीय पक्ष सीएएवरून लोकांची दिशाभूल करत आहेत. विद्यार्थ्यांनी राजकीय पक्षांच्या या प्रचाराला बळी पडू नये. कुठल्याही आंदोलनात उडी घेण्याआधी त्यांनी हा विषय पूर्णपणे समजून घ्यायला हवा,’ असं रजनीकांत म्हणाले.